पुणे : महिलेवर रोबोटिक असिस्टेड ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करीत पुण्यातील डॉक्टरांनी मेंदूविकार शस्त्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा गाठला. या प्रक्रियेत रोबोटिक तंत्रज्ञान समाविष्ट करून शल्यचिकित्सा पथकाने शस्त्रक्रियेमध्ये अचूकता साधत, कमीत कमी छेद देण्यावर भर दिला. यामुळे रक्तस्त्राव कमी होऊन रुग्ण बरा होण्याचा कालावधीही कमी झाला.

या ६० वर्षीय महिलेला २३ मार्चला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तपासणीत ब्रेन ट्यूमरचे निदान झाले. त्यातील गुंतागुंत आणि ट्यूमरचे ठिकाण लक्षात घेता डॉ. आनंद काटकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राहुल शर्मा आणि भूलतज्ज्ञ डॉ. नंदिनी लोंढे यांचा वैद्यकीय पथकाने रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. या अत्याधुनिक तंत्राद्वारे ट्यूमरला अचूकतेने लक्ष्य करणे शक्य झाले. याचबरोबर आजूबाजूच्या पेशींना होणारे नुकसान कमी झाले. या प्रक्रियेसाठी ९० मिनिटांचा वेळ लागला.

ही प्रक्रिया पारंपरिक ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियांपेक्षा खूपच कमी वेळात पार पडली. पारंपरिक प्रक्रियेमध्ये अनेकदा मोठे छेद समाविष्ट असल्याने रुग्णाचे रूग्णालयातील वास्तव्य जास्त असते. परंतु रोबोटिक असिस्टेड तंत्रामुळे कमीत कमी छेद आणि अधिक कार्यक्षम शस्त्रक्रिया प्रक्रिया करणे शक्य झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर बारकाईने देखरेख ठेवण्यात आली. रुग्णाला ४ एप्रिलला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रोबोटिक असिस्टेड प्रक्रियेमुळे रुग्णाची प्रकृती जलदरित्या सुधारत आहे.

रूबी हॉल क्लिनिकमधील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक भणगे म्हणाले की, रोबोटिक प्रणालीने शस्त्रक्रियेतील अचूकता लक्षणीयरित्या वाढवता येते. या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सक मेंदूच्या नाजूक संरचनेतून अचूकतेने मार्ग काढू शकतात व यामुळे प्रक्रियेची एकंदर कार्यक्षमता सुधारते. अधिक अचूकतेमुळे गुंतागुंतीचा धोका कमी होतो व रुग्णांना असुरक्षित व चांगले परिणाम मिळतात. याशिवाय रोबोटिक प्रणालीमुळे कमीत कमी छेद, कमी वेदना, रुग्णालयात कमी वास्तव्य शक्य होते. यामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

रोबोटिक असिस्टेड तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेत अधिक अचूकता साधता आली. याचबरोबर गुंतागुंतीची जोखीम कमी होऊन रक्तस्त्रावही कमी झाला. यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत झाली. ही शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाचे साहाय्य न्यूरोसर्जरी क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरेल. डॉ. आनंद काटकर, न्यूरोसर्जन, रुबी हॉल क्लिनिक