महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या पाईप गॅसच्या किमतीमध्ये युनिटमागे (एससीएम- स्टॅन्डर्ड क्यूबिक मीटर) दोन रुपयांची कपात करण्यात आली असली, तरी अडीच महिन्यांतील सुमारे पाच रुपयांची दरवाढ कायम आहे. त्यामुळे अद्यापही ग्राहकांसाठी हा गॅस महागच ठरत आहे. दरकपातीनंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात पाईप गॅस ४९.५० रुपये झाला आहे. मात्र, जूनमध्ये हा दर ४४.६६ रुपये इतका होता.
पाईप गॅसचा दर युनिटला ४९.५० रुपये –
पुणे शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरामध्ये चार रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यापाठोपाठ घरगुती पाईप गॅसच्या (पीएनजी) दरातही दोन रुपयांची कपात जाहीर करण्यात आली. त्यानुसार शहरात सीएनजी इंधनाचा दर किलोमागे ९१ रुपयांवरून ८७ रुपयांपर्यंत आला. घरगुती पाईप गॅसचा दर युनिटला ४९.५० रुपये झाला आहे. या दोन्ही इंधनाचे दर गेल्या दोन ते तीन महिन्यांतच मोठ्या प्रमाणावर वाढले होते. सीएनजीचा दर गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये किलोमागे १६ ते १७ रुपयांनी वाढले होते. त्यात चार रुपयांचा अल्प दिलासा मिळाला आहे.
एलपीजीच्या तुलनेत पाईप गॅस अद्यापही १६ टक्क्यांनी स्वस्त –
घरगुती पाईप गॅसचा दर अडीच महिन्यांपूर्वी जुलैमध्ये ४४.६६ रुपये होता. त्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल सात रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे पाईप गॅसचा दर ५१.५० रुपयांपर्यंत गेल्याने गॅसच्या बिलाचा आकडा एकदमच वाढला. या दरवाढीमधून सध्या दोन रुपयांचा अल्पसा दिलासा ग्राहकांना मिळाला असला, तरी अडीच महिन्यांतील दरवाढीचा विचार करता अद्यापही पाईप गॅस महागच ठरतो आहे. मात्र, एलपीजीच्या तुलनेत पाईप गॅस अद्यापही १६ टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून करण्यात येत आहे.