पुण्यात महिलेसह पाच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पिकनिकसाठी गेलेल्या या कुटुंबाची हत्या झाल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावरील एका गावात सकाळी सात वाजता महिलेचा मृतदेह आढळला. तर तेथून ३५ किमी दूर कात्रजजजळ पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. दरम्यान पती बेपत्ता असल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं असून पोलीस सध्या तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया अबीद शेख आणि आयान यांची हत्या करण्यात आली आहे, तर एका विमा कंपनीत ब्रांच मॅनेजर म्हणून काम करणारा पती आबिद बेपत्ता आहे. हे कुटुंब मूळचं मध्य प्रदेशातील असून पुण्यात लोहगावमधील ब्रुकलिन-प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये वास्तव्यास होतं.
प्राथमिक तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने पिकनिकला जाण्यासाठी ११ जूनला कार भाड्याने घेतली होती. आबिद यांनी नंतर कारचा कालावधी वाढवून घेतला होता. सोमवारी रात्री ९ वाजता त्यांचं मध्य प्रदेशातील आपल्या कुटुंबासोबत बोलणं झालं होतं. आपण अर्ध्या तासात घरी पोहोचू असं यावेळी त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता.
कार परत न आल्याने कार कंपनीचे कर्मचारी हाऊसिंग सोसायटीत पोहोचले होते. यादरम्यान आबिदच्या कुटुंबाने सोसायटीशी संपर्क साधला असताना कार कंपनीचे कर्मचारीही तिथे आले असल्याचं त्यांना कळालं. यानंतर त्यांनी पुण्यातील नातेवाईकाशी संपर्क साधत आबिद आणि इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान कार कंपनी कर्मचारी आणि नातेवाईकांनी जीपीसच्या सहाय्याने कारचा शोध घेतला असता सिटी प्राईड येथे पार्क केली असल्याचं आढळलं. रात्री सव्वा एक वाजता ही कार पार्क करण्यात आली होती. कारमध्ये रक्ताचे डाग दिसल्यानंतर त्यांना पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी हत्या झाल्याचं निष्पन्न झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयानची गळा दाबून हत्या करण्यात आली असून त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. तर आलियाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली”. दरम्यान कुटुंब सोमवारी हाऊसिंग सोसायटीत गेलं असता कार चुकीच्या जागी पार्क केल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या वेगवेगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही तपासत आहे. पुणे शहर, ग्रामीण पोलीस आणि क्राइम ब्रांच युनिट या हत्येचा तपास करत आहे. दरम्यान आबिद अद्याप बेपत्ता असून पोलीस शोध घेत आहेत.