पुणे : शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाकडून पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुलासह, मेफेड्रोन, कोयता जप्त केला. कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुंडाबरोबर असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी तौसिफ अमिर सय्यद उर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज) त्याचे साथीदार सूरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हीड इसार (वय २९, रा. गगनगिरी मंगल कार्यालयाजवळ, धानोरी, विश्रांतवाडी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसीडन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार जनाब (रा. लष्कर) पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस शिपाई धनाजी धोत्रे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – महायुती तुटणार, प्रत्येक पक्ष आता स्वतंत्र लढणार ? सहा महिन्यांत निवडणुकांची शक्यता
तौसिफ सय्यद याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. सय्यद याला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. सय्यद आणि साथीदार कात्रज भागात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संतोषनगर परिसरात सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याबरोबर असलेले साथीदार जाधव, इसार, जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार जनाब पसार झाला. सय्यद याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, मेफेड्रोन, वजन काटा, स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd