पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील वर्षभरात हजारो कोटींचा ड्रग्सचा साठा पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान मागील आठवड्यात फर्ग्युसन रोडवरील एक हॉटेल मध्ये अल्पवयीन मुल बाथरूम मध्ये ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी संबधित हॉटेल चालक आणि पार्टी आयोजक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक देखील केली. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्याकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना दिसत आहे. त्या सर्व घडामोडी दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी राजकीय घडामोडी त्यांनी भूमिका मांडताना पुणे शहरातील ड्रग्स प्रकरणी पुणे शहराचे खासदार केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली.

पुणे शहरातील ड्रग्स प्रकरणावर बोलताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, पुणे शहरात ड्रग्सचा साठा आढळल्यावर पोलिसांनी कारवाई केली. पण ती कारवाई म्हणजे एक नाटक होतं. राजकारण्याचं पाठबळ आणि पोलिसांची मदत असल्याशिवाय ड्रग्सचा व्यवहार होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-प्राध्यापकांच्या ‘लाभा’चा मार्ग मोकळा; पण सरकारी तिजोरीवर ३० कोटींपेक्षा अधिक ताण

तसेच ते पुढे म्हणाले की,गुजरात मार्गे देशातील अनेक भागात ड्रग्स पोहोचवले जात असून आपल्या राज्यात पुणे आणि नाशिक ही दोन ठिकाण ड्रग्स ची केंद्र बनली आहेत. पुण्यात ड्रग्स प्रकरण समोर आल्यावर, बुलडोझर लावून कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील ड्रग्स चा व्यवहार कमी होणार आहे का? असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की, आता पुण्याला केंद्रात मंत्री पद (मुरलीधर मोहोळ) मिळाले आहे. मात्र पुण्याचे प्रश्नच वेगळे असून विकासासोबत सामाजिक देखील प्रश्न आहेत. लाडले भाऊ, लाडली बहीण या योजना ठीक आहेत. पण घराघरातील भाऊ ड्रग्सच्या आहारी गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याची गरज असून ड्रग्सच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांनी ड्रग्स विरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला.

या टीकेला प्रत्युत्तर देताना पुणे शहराचे खासदार केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ की, फर्ग्युसन रोडवरील घटना समोर येताच, संबधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. तसेच या गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. तसेच ड्रग्स प्रकरणाकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन करून ड्रग्स येतात कुठून आणि वापरते कोण या सर्वांचा शोधला घेतला जावा, या संदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. संबधित व्यक्ती विरोधात कारवाई देखील केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-पुणेकरांना खुषखबर! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलला अखेर मुहूर्त

तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्याला काहीतरी वाटतं म्हणून उगाचच बोलायचं, कोणत्याही विषयावर बोलताना आपल्या हातामध्ये पुरावा असला पाहिजे. काही तरी संदर्भ ठोस असले पाहिजे. उगाचच रोज उठायच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीका करायची, विरोधासाठी विरोध करायचा, हे राज्यातील जनता सर्व पाहत आहे. त्यामुळे विरोधकांनी वैयक्तिक आकसासाठी बोलायचं थांबवा, शहरातील किंवा बाहेरच्या नेत्यांनी माझ्या शहराचं नाव कोणीही खराब करू नये, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे त्यांनी संजय राऊत यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले.