पुणे : गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एल थ्री बारमधील पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांना पुण्यातील अमली पदार्थ तस्कराने मेफेड्रोनचा पुरवठा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या तस्कराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये (एनडीएपीएस) कलमवाढ केली असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.

एल थ्री बारमधील पार्टीत तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी कारवाई करून बारच्या जागामालकासह आठ जणांना अटक केली. पार्टीत मेफेड्रोनचे सेवन करणारे नितीन ठोंबरे आाणि करण मिश्रा यांनाही अटक करण्यात आली. आतापर्यंत दहाजणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी ठोंबरे आणि मिश्रा यांनी पुण्यातून मेफेड्रोन खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्यांना मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या तस्कराचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त गिल यांनी सांगितले.

हेही वाचा…शिक्षक भरतीमध्ये मोठी अपडेट… ३ हजार १५० उमेदवारांची झाली शिफारस!

एल थ्री बारमधील पार्टीत सहभागी झालेल्या नऊ तरुणांचा पोलिसांनी शोध घेतला असून, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा…पिंपरी : अलंकापुरीत वैष्णव दाखल! इंद्रायणीकाठी स्नानासाठी गर्दी, वडिवळे आणि आंद्रा धरणातून पाणी सोडून इंद्रायणी नदी स्वच्छ

रात्रोत्तर पार्ट्यांची समाज माध्यमांत जाहिरात

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पबचालकांनी रात्री साडेबारापूर्वी पब बंद करावेत, असे आदेश पोलिसांनी दिले. त्यानंतरही काहीजण ‘लेटनाइट पार्टी’ आयोजित करत असल्याचे उघडकीस आले आहे. समाज माध्यमांचा वापर करून अशा प्रकारच्या पार्ट्यांची जाहिरात केली जाते. कल्ट पबमध्ये शनिवारी रात्री एक पार्टी झाली. त्यातच कामठेने ध्वनिवर्धकावरून एल थ्री बारमधील लेटनाइट पार्टीची घोषणा केली होती. तेथून एल थ्री बारमध्ये आलेल्या तरुणांसाठी समाज माध्यमात ‘पुणे व्हाइब्ज’ नावाने समूह तयार करण्यात आला होता. या रात्रोत्तर पार्टीसाठी ऑनलाइन आणि रोख स्वरूपात पैसे घेतले गेले होते.