पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहनचालकांंविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांकडून रात्री नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांंत मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या अडीच हजार जणांंविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५०० जणांचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे. संबंधित वाहनचालकांंचे परवाने किमान सहा महिन्यांंपर्यंत निलंबित होणार असल्याने त्यांना वाहन चालविण्यास बंदी असणार आहे. या कारवाईमुळे मद्यपी वाहनचालकांची आता झिंग आता उतरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मद्य पिऊन भरधाव वेगाने वाहन चालविण्यात येत असल्याने गंभीर स्वरुपाचे अपघातही घडत आहेत. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मोटारचालक मुलाने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. त्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्य पिऊन भरधाव वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचा आदेश दिला.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टरांचा जाहीरनामा! राजकारण्यांकडे केलेल्या मागण्या जाणून घ्या…

पोलीस आयुक्तांच्या सूचनेनंतर गेल्या चार महिन्यांंपासून शहरात दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.

मद्य पिऊन भरधाव वाहन चालविल्याने, तसेच वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघात होतात. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येत आहे. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू आहे. गेल्या चार महिन्यांंत अडीच हजार मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनचालकांचा वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. उर्वरित वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्तावही लवकरच पाठविण्यात येणार आहे. – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, तब्येतीची केली विचारपूस

वाहतूक पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाच्या आधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित केले जातात. हे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले जातात. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यास या वाहनचालकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले जाऊ शकतात. – स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई

महिना – दुचाकीवरून तिघांचा प्रवास – विरुद्ध दिशेने वाहन चालविणे – मद्य पिऊन वाहन चालविणे – एकूण कारवाई

जुलै – ५२१८ – ३६९१ – ६५८ – ९५६७

ऑगस्ट – ४८५५ – ३३२२ – ४३० – ८६०७

सप्टेंंबर – ८२२३ – १६५५१ – ३५ – २४८०९

ऑक्टोबर – ५८२० – ४५२१३ – १४३३ – ५२४६६

एकूण – २४११६ – ६८७७७ – २५५६ – ९५४४९

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune drunk drivers action against 2500 people proposal to suspend 500 licenses print politics news rbk 25 ssb