पुणे : शहरात वाढत असलेल्या ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गेल्या दहा दिवसांमध्ये २५ टाक्यांची स्वच्छता केली आहे. तसेच, उर्वरित टाक्यांची स्वच्छतादेखील पुढील काही दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता.सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, नांदोशी, नांदेड तसेच किरकिटवाडी या भागात ‘जीबीएस’चे संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याचे समोर आले होते. या भागातील नागरिकांना दिले जाणारे पाणी दूषित असल्याने हे रुग्ण वाढत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील ‘ईएसआर’ (उन्नत पाण्याच्या टाक्या) आणि ‘जीएसआर’ (भूमिगत पाण्याच्या टाक्या) स्वच्छ केल्या जाणार आहेत. त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.शहरात महापालिकेच्या सुमारे १५५ टाक्या आहेत. त्या टाक्यांची स्वच्छता महिनाभरात करण्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दहा दिवसांमध्ये २५ टाक्यांची स्वच्छता प्रशासनाने पूर्ण केली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. या पाण्याच्या टाक्यांमधून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. या स्वच्छतेसाठी टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत आहे.

पाणीपुरवठा बंद ठेवून या टाक्यांची स्वच्छता केली जात आहे. टाक्यांची स्वच्छता करताना त्यामध्ये साठलेला गाळ, पाण्याबरोबर वाहून आलेली वाळू काढून टाकी स्वच्छ करण्यात येत आहे. या टाक्यांमध्ये दररोज चार वेळा पाणी भरले जाते, त्यामुळे त्या फारशा अस्वच्छ नसतात. काही टाक्यांमध्ये गाळ जमा होतो, तो काढून टाक्या स्वच्छ करण्यात येत आहेत. ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो, त्याच दिवशी टाक्यांची स्वच्छता करण्याचा प्रयत्न असल्याचे जगताप यांनी सांगितले.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, पाण्याच्या टाक्या स्वच्छ करताना ज्या भागांना पाणीपुरवठा होतो, त्यामध्ये फारशी अडचण येऊ नये, असे नियोजन केले जात आहे. पाणीपुरवठा होणारा ठरावीक भाग वगळता इतर कोणत्याही दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची विशेष खबरदारी घेत टाक्यांची स्वच्छता केली जात आहे.

टाक्यांची स्वच्छता का?

‘जीबीएस’ आजाराला कारणीभूत असलेले जीवाणू ‘जीबीएस’चा हाॅटस्पाॅट असलेल्या भागातील वेगवेगळया ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांत सापडले आहेत. मात्र, त्याचा नेमका स्रोत अद्यापही महापालिकेला सापडलेला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून या साथीला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. याच उपायांचा एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने टाक्यांच्या स्वच्छतेचा हा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश दिले होते.

‘आरओ’ प्रकल्पांची सोमवारपासून पाहणी

शहरातील नागरिकांना ज्या खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून (आरओ प्लांट) मधून पाणी दिले जाते. ते पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल आल्यानंतर पालिकेने त्या आरओ प्लांटला टाळे ठोकले होते. मात्र, त्यातील अनेक प्रकल्प पुन्हा सुरू झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याचे समोर आल्याने महापालिकेने या प्रकल्पचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा विचार सुरू केला आहे. सोमवारपासून (२४ फेब्रुवारी) आरओ प्लांटची तपासणी सुरू केली जाणार आहे. त्याच्या सर्व सूचना पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.

‘टाक्या स्वच्छ करणे कठीण काम’

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या टाक्या स्वच्छ करण्याचे काम ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर घेतले आहे. टाक्यांच्या स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, की या टाक्यांचा आकार खूप मोठा असतो आणि धरणातून पाणी येते, तेव्हा त्याबरोबर गाळ, पाण्याबरोबर वाहून आलेली वाळूही अनेकदा वाहून येते. विविध भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या या टाक्यांमध्ये दररोज चार वेळा पाणी भरले जाते आणि पुढे ते सोडले जाते. त्यामुळे या टाक्या फारशा अस्वच्छ नसतात. टाक्या स्वच्छ करण्यासाठी कुठलेही रसायन वापरले जात नाही, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केेले. मात्र, या टाक्या नेमक्या किती काळाने स्वच्छ करण्यात येतात, यावर त्यांनी काही भाष्य केले नाही.

Story img Loader