कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापनाबद्दल देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याची निवड करण्यात आली असून त्यासाठीचा पुरस्कार महापौर वैशाली बनकर यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात स्वीकारला. ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीतर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
देशातील दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. अशी बावन्न शहरे निवडून या शहरांमध्ये पीएसओएस या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. पहिल्या सर्वेक्षणातून वीस शहरांची निवड करण्यात आली. त्यानंतर या वीस शहरांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात पुण्याची निवड वाहतूक व्यवस्थापनातील सर्वोत्तम शहर म्हणून करण्यात आल्याचे महापौर बनकर यांनी सांगितले.
या वीस शहरांमध्ये तेरा मुद्यांवर सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने वाहतूक, गृहसंकुलांची बांधणी, शहरांमधील स्वच्छता, पर्यावरण, कायदा व सुव्यवस्था, ऊर्जा उपलब्धता, महिलांची सुरक्षितता, पर्यटनस्नेही योजना, आरोग्य सुविधा, प्राथमिक शिक्षण आदी मुद्दे होते. त्यातील वाहतूक व्यवस्थेबाबत झालेल्या सर्वेक्षणात पुणे शहरवासीयांनी जी माहिती दिली, त्यानुसार पुण्याची निवड करण्यात आल्याचेही महापौर म्हणाल्या. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात महापौरांनी बुधवारी हा पुरस्कार स्वीकारला.