पुणे : नागरिकांचे गहाळ झालेले, तसेच चोरी गेलेले मोबाइल संचाचा शोध घेणे तसे अवघड आहे. शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे ५३ मोबाइल संच परत मिळवून दिले आहेत. गहाळ झालेले मोबाइल संच परगावात आणि परराज्यात वापरत असल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वापरकर्त्यांशी संपर्क साधून मोबाइल संच परत करण्याची सूचना केली. गहाळ झालेले मोबाइल संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला
मोबाइल संच चोरीला गेल्यानंतर किंवा गहाळ झाल्यानंतर परत मिळण्याची शाश्वती नसते. मोबाइलमधील महत्वाची माहिती (डेटा) आणि अन्य माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी नागरिक तक्रार देतात. त्यानुसार मोबाइल चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील सायबर कक्षाकडे आल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलीस कर्मचारी आदेश चलवादी, रुपेश वाघमारे, रुचिका जमदाडे यांनी हरवलेल्या मोबइलची माहिती संकलित करून तांत्रिक तपास सुरू केला. हरवलेले मोबाइल महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसह परराज्यात वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मोबाइलचा आयएमईआय नंबर, तसेच तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी साडेअकरा लाख रुपये किमतीचे ५३ मोबाइल शोधले.
हेही वाचा…राज्यात नव्या खासगी शाळा सुरू करण्यावर आता नियंत्रण; बृहद् आराखडाच तयार होणार
अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाइल संच परत करण्यात आले. महागडे मोबाइल मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.
मोबाइल गहाळ झाल्यास तक्रार करा
मोबाइल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर किंवा राज्य सरकारच्या ‘सीईआयआर’ या पोर्टलवर नोंद करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
© The Indian Express (P) Ltd