पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत मेट्रोचा २०० किलोमीटर लांबीचा विस्तारित प्रारूप प्रकल्प आराखडा महामेट्रोकडून करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पुण्यातील ८८ किलोमीटर लांबीच्या आराखड्याचे महामेट्रोकडून महापालिकेला मंगळवारी सादीरकरण करण्यात आले. या प्रारूप प्रकल्प आराखड्यानुसार खडकवासल्यापासून खराडीपर्यंत मेट्रोचे विस्तारीकरण केले जाणार असून उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग, निओ मेट्रोबरोबरच स्वारगेट-पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गिकांच्या विस्तारीकरणाचा यामध्ये समावेश आहे.
हेही वाचा >>> पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांची कृती समिती
दरम्यान, एकूण दोनशे किलोमीटर लांबीचा हा प्रारूप प्रकल्प आराखडा असून महापालिका प्रशासनाने त्याला मान्यात दिल्यानंतर आराखडा अंतिम करून तो राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. मेट्रो विस्तारित मार्गाचा प्रारूप प्रकल्प आराखडा महामेट्रोकडून काही दिवसांपूर्वी महापालिकेला सादर करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी त्याचे सादरीकरण महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना करण्यात आले. मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, सल्लागार पी. के. आचार्य, वाहतूक विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला या वेळी उपस्थित होते. येत्या काही दिवसांत मेट्रो मार्गिकेच्या प्रस्तावित ठिकाणांना भेट देऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> पुणे : रस्ते सुशोभीकरणासाठी पंधरा कोटींच्या खर्चाला मान्यता
मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३२ किलोमीटर एवढी आहे. या दोन्ही मार्गिकांमध्ये काही अंतरावर प्रवासी सेवा महामेट्रोकडून सुरू करण्यात आली असून पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत संपूर्ण ३२ किलोमीटर लांबीच्या अंतरात मेट्रोची सेवा सुरू करण्याचे नियोजित आहे.मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त मार्गांचा विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत या दोनशे किलोमीटर लांबीच्या मार्गांचा विस्तार केला जाणार आहे. त्यामध्ये पुण्यातील प्रस्तावित ४३ किलोमीटर उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) आणि पिंपरी-चिचंवडमधील ३१ किलोमीटर लांबीच्या निओ मेट्रोचाही समावेश आहे. मेट्रोचा टप्पा एक आणि दोन अशा मिळून एकूण २०० किलोमीटर लांबीच्या मार्गिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील ८४ किलोमीटर लांबीच्या अंतरामध्ये खडकवासला ते खराडी ही २५ किलोमटीर लांबीची मार्गिका प्रस्तावित आहे. त्यासाठी आठ हजार ५६५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते स्वारगेट-हडपसर-खराडी हा स्वतंत्र मार्ग असून या मार्गामध्ये २२ स्थानके आहेत. पूर्वी हा मार्ग मेट्रो आणि पीएमआरडीएकडून संयुक्त करण्यात येणार होता. मात्र पुम्टाच्या बैठकीत स्वतंत्र मार्ग करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार मार्गाचा आराखडा करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ‘पीएफआय’बरोबरील रद्द करारावरून राजकारण; पुण्यात भाजप, राष्ट्रवादी यांची परस्परांवर टीका
मेट्रो टप्पा एक-
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड- १७. ४ किलोमीटर
वनाज ते रामवाडी- १५.७ किमी
मेट्रो मार्गांचा विस्तार
पिंपरी-चिंचवड ते निगडी- ४.४१ किलोमीटर
स्वारगेट ते कात्रज- ५.४६ किलोमीटर
भोसरी ते चाकण- १५ किलोमीटर
मेट्रो टप्पा २
वनाज ते चांदणी चौक- १.१२ किलोमीटर
रामवाडी- वाघोली- ११.६३ किलोमीटर
खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला- २५.६४ किलोमीटर
एसएनडीटी ते वारजे- ६.१२ किलोमीटर
एचसीएमटीआर- ४३.८४ किलोमीटर
एचसीएमटीआर (पिंपरी-चिंचवड)- ३१ किलोमीटर
हिंजवडी-शिवाजीनगर- २३.३ किलोमीटर
एकूण- २००.६३ किलोमीटर