पुणे : गेल्या काही दिवसांत तापमानात घट झाल्याने पुण्यातील गारठा वाढला आहे. पुण्यातील गेल्या दोन वर्षांतील डिसेंबरच्या पूर्वार्धातील सर्वांत कमी तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणासाठी पुण्याची ओळख आहे. दिवाळीच्या सुमारास थंडीची चाहूल लागली होती. मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, मिचौंग चक्कीवादळ अशा कारणांनी हवामानात सातत्याने बदल होत होते. तापमानातही वाढ झाली. मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा किमान तापमानात घट होऊ लागली आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार डिसेंबरच्या पूर्वार्धात पुण्यात सरासरी तापमान १५.८ अंश सेल्सियस असते. त्यानुसार डिसेंबरच्या पूर्वार्धात २०२२मध्ये १५.१, २०२१मध्ये १५.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. तर यंदा १५ डिसेंबर रोजी सकाळी १२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत डिसेंबरच्या पूर्वार्धातील सर्वांत कमी तापमान यंदा नोंदवले गेल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा… पुणे: पूर्व भागात दोन दिवस पाणीबाणी
हेही वाचा… पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने; ‘राष्ट्रवादी’चा लोकसभा मतदार संघावर दावा
गेल्या काही दिवसांतला आल्हाददायक गारवा येत्या दोन दिवसांत कमी होऊन १७ आणि १८ डिसेंबरला तापमान वाढण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यात किमान तापमान एक आकडी होण्यासाठी, म्हणजे थंडी वाढण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.