अनोळखी तरुणीशी झालेली मैत्री एका तरुणाला महागात पडली. मैत्रीच्या आमिषात (हनी ट्रॅप) अडकवून तरुणी आणि साथीदारांनी तरुणाकडून ६७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे. धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणाने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर दोघा सराइतांना अटक करण्यात आली.
चेतन रवींद्र हिंगमिरे (रा. काळेपडळ हडपसर), निखील उर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (रा.गाडीतळ हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका तरुणीसह तिघांच्या विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका २६ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणाच्या चुलत भावाची खडी मशीन व्यवसाय (स्टोन क्रशर) आहे. तो चुलतभावाच्या कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करत आहे. तरुणाकडे खडी मशिनचे आर्थिक व्यवहार आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात तो नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा परिसरात गेला होता. त्या वेळी तेथील एका लॅाजवर तो मुक्कामासाठी थांबला होता. त्या वेळी एकाने त्याला तरुणीचा मोबाइल क्रमांक देऊन संपर्क साधण्यास सांगितले.
गर्भवती असल्याचे सांगून पैसे उकळले –
तक्रारदार तरुण आणि तरुणीची ओळख झाली. दोघेजण बोपदेव घाट परिसरात भेटले. तरुणीशी ओळख वाढल्यानंतर त्याने तिला आर्थिक मदत केली. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे दुचाकी खरेदीसाठी पैसे मागितले. तरुणाने तिला ऑनलाइन २५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर तरुणीने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. मी गर्भवती असून पती चेतन हिंगमरेला या प्रकाराची माहिती देणार आहे, असे तरुणीने त्याला सांगितले. घाबरलेल्या तरुणाने आरोपी तरुणी आणि हिंगमिरेला पैसे दिले.
घाबरलेल्या तरुणाने अखेर गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला –
त्यानंतर हे प्रकरण वानवडी पोलिसांकडे गेले असून तरुणी अल्पवयीन असल्याचे आरोपी निखिल म्हेत्रेने सांगितले. तक्रारदार तरुणाला वाघोली येथे बोलावून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून वेळोवेळी ६७ लाख ७ हजार ५५३ रुपये उकळले. घाबरलेल्या तरुणाने अखेर गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पथकाने आरोपी हिंगमिरे आणि म्हेत्रे यांना अटक केली. आरोपी चेतन सराइत असून या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.