पावसाळा संपला, संपला म्हणेपर्यंत तो परत जाताना, जे थैमान घालून जातो आहे, त्याने पुण्या-मुंबईच्या नागरिकांचे जगणे अक्षरश: हैराण करून सोडले आहे. हे असे घडणारच नाही, अशा मूर्ख कल्पनेत राहून जुजबी डागडुजी करून पाठ थोपटून घेणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रशासनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. इतका कोडगेपणा फार क्वचित पाहायला मिळतो! पुण्यासारख्या शहरातील रस्ते या पावसाच्या पाण्याला वाट करून देऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जागोजागी साचलेल्या डबक्यातून वाट काढत मुंगीच्या पावलाने पुढे जाताना, जीव मुठीत धरून ठेवणेही कठीण व्हावे, अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीत तासन् तास अडकलेल्या पुणेकरांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे.

हेही वाचा >>> राज्यातील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा… कधी, कोणत्या विषयांची होणार परीक्षा?

वाहनांची प्रचंड संख्या, त्यात पावसाच्या अंदाजाने चारचाकींची गर्दी, अपुरे रस्ते, त्यात पुरेसे खड्डे, त्यातच रस्त्यांवरच थाटलेले शेकडो उद्योग, पथारीवाले या सगळ्या अवस्थेला जबाबदार कोण? हा प्रश्न विचारण्याची ताकदही राहू नये, अशी पुणेकरांची अवस्था. यंदा पावसाने पुण्यावर कृपादृष्टी केली खरी, पण त्यामुळे फक्त पाण्याचा प्रश्न सुटला. मात्र वाहतुकीचा प्रश्न डायनासोरसारखा महाभयानक होऊन उभा ठाकला. गणेशोत्सवात मंडळांच्या मांडवांमुळे वाहतूक कोंडी होत होती. उत्सव संपला, तरी बऱ्याच ठिकाणी मांडव अजून तसेच. म्हणजे वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता तेवढीच धूसर. त्यातच कोसळणाऱ्या पावसाने केलेला कहर. या भीषण परिस्थितीत तग धरून राहण्याची कसरत करणे, हेच पुणेकरांच्या भाळी लिहिलेले भागधेय आहे.

हेही वाचा >>> महाविद्यालयाच्या आवारात अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी – MVA कडून आयुक्तालयासमोर आंदोलन

पावसाळ्यापूर्वी पाणी वाहून नेणारी यंत्रणा कार्यरत करणे, हे दरवर्षी करण्याचे काम. त्याचे कंत्राट आणि कार्यवाही, यांत्रिक पद्धतीने होणे अपेक्षित. कागदोपत्री हे सारे दरवर्षी होते आणि तरीही दरवर्षी त्याच त्या जागी पाणी साचून राहते. पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या काम करेनाशा होतात. शहराचे सिमेंटीकरण केल्याने, पाणी झिरपण्याची व्यवस्था कोलमडलेली. अशा सिमेंटच्या रस्त्यांना दोन्ही बाजूला पन्हाळी करण्याची कल्पना कधीच बाद झालेली, त्यामुळे साचलेल्या पाण्याला वाटच मिळत नाही. हे असेच घडणार, हे माहीत असूनही नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या लाखो पुणेकरांना या जलदिव्यातून जावे लागतेच आहे. प्रश्न एवढाच, की हे सारे सामान्यांना समजते, तसे पालिकेला का उमजत नाही?

ते पालिकेला उमजते, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती हे प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण करते. वाढत्या वाहनसंख्येला पुरतील असे रस्ते शहरात आता उरलेले नाहीत. एवढी वाहने वाढतील, याचा अंदाज नसणारे नगरसेवक आणि त्यांना मदत करणारे प्रशासन यांना या शहराच्या भविष्याची चिंता पाच सहा दशकांपूर्वीच असती, तर कदाचित काही फरक पडण्याची शक्यता तरी होती. दूरदृष्टीचा अभाव, हे पुण्याच्या भाळी लिहिलेले कायमचे वास्तव असल्याने सतत तात्पुरत्या डागडुजीने भागवण्याची पद्धत रूढ झाली. कुणालाच या शहराबद्दल ममत्व नसल्याचे हे चित्र भविष्य किती काळवंडणार आहे, याची चुणूक दाखवणारे आहे. एकेकाळी निवासासाठी आदर्श वाटणारे पुणे शहर, आता राहण्यायोग्य राहिलेले नाही, याची तीव्र जाणीव समस्त पुणेकरांना होऊ लागली आहे. केवळ पर्याय नाही, म्हणून या शहरात राहावे लागण्याचे दुर्भाग्य त्यांच्या वाट्याला यावे, हे अधिक खेदजनक.

मूळच्या पुणे शहरातील या स्थितीशी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील परिस्थितीशी तुलनाच होऊ शकणार नाही, अशी आजची स्थिती. कागदावर ही गावे महानगरपालिकेत आहेत. तेथील नागरिक पालिकेचा करही भरत आहेत, पण त्याचे आयुष्य म्हणजे जळो जिणे लाजिरवाणे असे आहे. या समाविष्ट गावातील नागरिकांना रस्त्यावर येऊन पालिकेपासून सुटका करून घेण्याची मागणी करावी लागणे, हे अधिक चिंताजनक. भर पावसात अर्धा किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्धापाऊण तास वाहनासह उभे राहण्याची ही शिक्षा भोगण्याची वेळ पुणेकरांवर आता नेहमीच येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यातील या भयावह परिस्थितीमुळे पुढील वर्षी काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा बाळगण्याचा मूर्खपणा मात्र  कुणीही करू नये. mukundsangoram@gmail.com