पुणे : लोणीकाळभोर भागात गेल्या पाच वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तोतया डॉक्टरला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला डॉक्टर दहावी उत्तीर्ण आहे. लोणी काळभोर भागात तो दवाखाना चालवित असून, त्याने अनेकांवर उपचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश रंगनाथ तोरणे (वय ६३, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतया डॉक्टरचे नाव आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकारी डॉ. रुपाली रघुनाथ भंगाळे (वय ३८,रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. तोरणे याचे कदमवाकवस्ती परिसरात जनसेवा क्लिनिक आहे. हवामानातील बदलामुळे अनेकजण सध्या आजारी पडत आहेत. तोरणे याच्या दवाखान्यात रुग्ण मोठ्या संख्येने उपचारसाठी यायचे. तोरणे याच्याकडे वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती एका नागरिकाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली होती.

हेही वाचा…लोणावळा: जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या टोळीला केलं गजाआड; ४८ किलो गांजा जप्त

त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक तोरणे याच्या दवाखान्यात गेले. दवाखान्याचा नामफलकावर तोरणे याचे नाव होते. नामफलकावर तोरणे याने वैद्यकीय पदवीचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाला संशय आला. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तेव्हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसल्याचे उघडकीस आले. चौकशीत तोरणे दहावी उत्तीर्ण असल्याचे उघडकीस आले.

तोरणे गेल्या पाच वर्षांपासून लोणी काळभोरमधील कदमवाक वस्तीत वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

हेही वाचा…राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

सर्व आजारांवर तोतया डॉक्टराकडून उपचार

तोरणे दहावी उत्तीर्ण आहे. त्याच्या रुग्णालयात एक खाट असल्याचे आढळून आले. साथीच्या सर्व आजारांवर तोरणे उपचार करत होता. त्याच्या दवाखान्यात रुग्णांच्या कायम रांगा लागत होत्या. तोरणेने गेल्या पाच वर्षात हजारो रुग्णांवर उपचार केल्याची माहिती तपासात उघडकीस आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune fake doctor arrested after practicing medicine for five years in loni kalbhor pune print news rbk 25 psg