‘नाईक कृषी उद्योग’

हल्ली शहरी भागातही बागकामाला मोठे महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. बागकाम म्हटले की बी-बियाणे, खते, कीटकनाशके, वेगवेगळी उपकरणे हे सगळे आले. या व्यवसायात गेली तीस वर्षे स्थिरावलेली आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलेली कंपनी म्हणजे ‘नाईक कृषी उद्योग’. पार पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांपर्यंत माल पाठवणाऱ्या या उद्योगाचा वारसा मात्र सत्तर वर्षांहून मोठा आहे. पुण्यात बी-बियाणांच्या व्यवसायात मोजकेच व्यावसायिक असताना अनंत बाळकृष्ण नाईक यांनी येथे व्यवसाय सुरू केला आणि त्यांचे नातू आशिष नाईक यांनी ती परंपरा पुढे नेली.

readers feedback on loksatta editorial
लोकमानस : ‘केसरी’च्या बातमीबद्दल शंकेस वाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Firewall , Wife, Children Property Rights, MWPA,
जिम्मा न् विमा : पत्नी, मुलांच्या मालमत्ताधिकाराचा फायरवॉल – एमडब्ल्यूपीए
renowned flautist pandit ronu majumdar creates guinness world record by performing at indian classical music event with 546 musicians
५४६ संगीतकारांचा सांगीतिक आविष्कार; ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांचा विश्वविक्रम; ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
Arvind Pilgaonkar passed away, Veteran singer-actor Arvind Pilgaonkar, Arvind Pilgaonkar ,
ज्येष्ठ गायक – अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Loksatta book batmi John Baxter Paris
बुकबातमी: जॉन बॅक्स्टरचे पॅरिस…
Nahar brothers success story
Success Story: इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक; करोना काळात सुरू केलेला व्यवसाय आता १०० कोटींच्या घरात पोहोचला

बागकामाची आवड असणाऱ्यांसाठी ‘नाईक कृषी उद्योग’ हे नाव नवीन नाही. बी-बियाणे, कीटकनाशके, खते आणि शेती व बागकामासाठी लागणाऱ्या अद्ययावत उपकरणांच्या व्यवसायात ही कंपनी गेली तीस वर्षे कार्यरत आहे. या कंपनीचा वारसा मात्र ७७-७८ वर्षांचा आहे. नाईक कृषी उद्योग सुरू केला आशिष नाईक यांनी. मात्र व्यवसायातील त्यांचे गुरू त्यांचे आजोबा अनंत बाळकृष्ण ऊर्फ अण्णासाहेब नाईक.

अनंत नाईक यांनी १९३९ मध्ये ‘ए. नाईक अँड कंपनी’ या नावाने व्यवसाय सुरू केला. शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीत तेव्हा पुण्यात केवळ तीन-चार दुकाने होती. दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ. लष्करासाठी लेटय़ूस, पार्सली अशा काही विशिष्ट परदेशी भाज्या पिकवल्या जात. त्यासाठी नाईक पुण्यातील ‘सदर्न कमांड’ला बी-बियाणांचा पुरवठा करू लागले आणि त्यांना चांगला फायदा झाला. बियाणांबरोबर, रोपे, बागकामाची उपकरणे अशा विविध क्षेत्रात ते यशस्वीपणे काम करत होते. चिकाटी आणि वक्तशीरपणा हे अनंत नाईकांचे गुण. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षांपर्यंत ते कार्यरत राहिले. त्यांच्या हाताखाली आशिष यांना व्यवसायाचे उत्तम शिक्षण मिळाले. १९८६ मध्ये आणखी अद्ययावत उत्पादनांच्या विक्रीसाठी आशिष यांनी साडेसात हजार रुपयांच्या भांडवलावर ‘नाईक कृषी उद्योग’ सुरू केला. तेव्हा ते अवघे २१ वर्षांचे होते. व्यवसायात पोती उचलण्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि पुढे त्यांना चांगले यश मिळत गेले.

नाईक प्रामुख्याने किरकोळ विक्री करतात. त्यांच्याकडे येणारा तीस टक्के ग्राहक शेतकरी आहे, तर इतर ग्राहक शहरी आहे. कॉर्पोरेट कंपन्या, फार्म हाऊसेस यांना ते प्रामुख्याने विक्री करतात. कृषी व बागकामासाठीची तब्बल साडेबारा हजार उत्पादने ते सध्या विकतात. या क्षेत्रातील जवळपास शंभर कंपन्यांशी ते थेट व्यवहार करतात. २००३ पासून ते अद्ययावत बागकाम उपकरणांमध्ये उतरले. बाजारात सहजासहजी न मिळणाऱ्या वस्तू ते आवर्जून ठेवतात. इस्रायलच्या प्रसिद्ध कंपनीची पाण्यात विरघळणारी खतेही ते विकतात.

कृषी आणि बागकाम उत्पादनांच्या बाजारात चिनी माल पुष्कळ खपतो. परंतु जिथे-जिथे शक्य आहे तिथे चिनी माल टाळायचा हे नाईक यांनी पाळले. चिनी मालाचा दर्जा दुय्यम निघणे आणि त्या उपकरणांचे सुटे भाग न मिळणे ही त्यातील प्रमुख समस्या. ‘दुकानाची पायरी उतरल्यानंतर मालाची ‘गॅरेंटी’ मागू नका, हे काही आमच्यासाठी शोभनीय नाही. चार पैसे जास्त द्यावे लागलेले ग्राहक विसरतो, पण वस्तू उत्तम टिकली, तर त्यासाठी विक्रेत्याची आठवण ठेवतो,’ असे आशिष सांगतात.

जगातील प्रसिद्ध कंपन्यांच्या भारतातील कार्यालयांकडून नाईक उपकरणे घेतात. बागकामासाठीची जवळपास सर्व उपकरणे आता ‘ऑनलाईन’ आणि स्वस्त दरातही उपलब्ध असतात. परंतु ती नेमकी कशी चालवायची, त्यांची दुरुस्ती कशी करून घ्यायची असे अनेक प्रश्न ग्राहकांपुढे उपस्थित होतात. नाईकांकडे जी उपकरणे मिळतात, त्यांची दुरुस्ती सेवाही ते उपलब्ध करून देतात. मूळ व्यावसायिकापैकी किमान एकाला तरी दुरुस्ती आलीच पाहिजे हा त्यांचा नियम. आशिष यांचा मुलगा जय हा उपकरणांच्या दुरुस्तीत पारंगत आहे. दुसरा मुलगा राज हाही या व्यवसायात लक्ष घालू लागला आहे. सहा महिन्यात त्यांची आणखी एक शाखा पुण्यात सुरू होते आहे.

ग्राहकाचा विश्वास सांभाळणे व्यवसायात फार महत्त्वाचे असते, असेही ते आवर्जून सांगतात. यासंबंधी चार-पाच वर्षांपूर्वी घडलेली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. एका मोठय़ा कंपनीने बनवलेल्या खुरपणी यंत्राची नाईक कृषी उद्योगाने विक्री केली होती. त्या कंपनीस भारतात नफा न झाल्यामुळे त्यांनी येथील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आणि यंत्रांच्या सुटय़ा भागांचा पुरवठा अनियमित झाला. ज्या शेतकऱ्यांनी बराच खर्च करून ती यंत्रे घेतली होती त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब होती. त्या वेळी नाईकांनी कंपनीस पत्र लिहून अडचण कळवली, संबंधित शासकीय यंत्रणेसही कळवले आणि कंपनी सर्व खुरपणी यंत्रे परत घेण्यास तयार झाली. नाईकांना त्या वेळी काही प्रमाणात तोटा झाला, परंतु ग्राहकांना त्यांचे सर्व पैसे परत केले, असे आशिष सांगतात.

‘वस्तू उगाच स्वस्त विकणार नाही. चार पैसे जास्त पडतील, पण दर्जा उत्तम देऊ,’ हा बाणा अस्सल पुणेरी व्यावसायिकांपैकी अनेकांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. आशिष नाईक यांच्याशी बोलतानाही तोच जाणवतो. बहुदा म्हणूनच केवळ पुण्यातूनच नव्हे तर देशभरातून त्यांना मागणी येते आणि बागकामवेडी मंडळी कौतुकाने त्यांचे नाव काढतात.

संपदा सोवनी sampada.sovani@expressindia.com

Story img Loader