पुणे : नाना पेठेत जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. वाडा बंद असल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र, शेजारी असलेल्या दोन इमारतीतील रहिवाशांना सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. आगीमागचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग दीड तासात आटोक्यात आणली.
नाना पेठेतील राम मंदिराजवळ जुना लाकडी वाडा आहे. या वाड्याचे मालक पारेख नावाची व्यक्ती आहे. गेल्या दहा वर्षांपासून लाकडी वाडा बंद आहे. वाड्यात मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा साचलेला आहे. या वाड्याच्या शेजारी दोन इमारती आहेत, तसेच दुकाने आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास लाकडी वाड्यात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. लाकडी वाड्याला लागलेला आग भडकल्याने अग्निशमन दलाने जादा कुमक मागविली. नाना पेठेतील अरुंद रस्त्यांवर महापाालिकेकडून करण्यात येणाऱ्या कामांमुळे घटनास्थळी त्वरीत मदत पोहोचण्यास अडथळे आले. वाड्याने पेट घेतल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून शेजारी असलेल्या दोन इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढले. आगीची झळ इमारतीला पाेहोचू नये म्हणून पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. रविवासी इमारतीतील सिलिंडर सुरक्षेचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले्.
अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांसह ८० ते १०० जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्री दहाच्या सुमारास आग आटोक्यात आणली. लाकडी वाडा पूर्णपणे जळाला असून, वाड्याचा काही भाग ढासळला आहे. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अश माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.