पुणे : रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात रामसुख मार्केटमधील दुकानात सकाळी आग लागली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
रामसुख मार्केटमध्ये तळमजल्यावर दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाला मिळाली. चार बंब घटनास्थळी दाखल झाले. दुकानामध्ये कोणी अडकले आहे का याची खात्री करुन चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात माल होता. आजुबाजूला इतर दुकाने आणि घरे असल्याने आग पसरु नये, याची काळजी घेऊन जवानांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा – पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
धुराचे प्रमाण मोठे असल्याने दलाकडून ब्लोअर यंत्रणेचा वापर करुन आजुबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले. आगीमागचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. रामसुख मार्केट व्यावसायिक इमारत आहे. इमारतीत विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने आहेत. आगीत शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचे पूर्ण नुकसान झाले असून दुकानातील सर्व माल जळाला आहे.
हेही वाचा – पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे, संदीप कर्णे, दत्तात्रय वाघ, अनिकेत ओव्हाळ, संदिप थोरात, भाऊसाहेब चोरमले, भरत वाडकर, चंद्रकांत गावडे, आदींनी आग आटोक्यात आणली.