अवघ्या आठवड्यापूर्वीच पुण्याच्या शिवाजी मार्केटमध्ये आग लागली होती. त्यानंतर पुन्हा पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही आग लागली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. फॅशन स्ट्रीट भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कापडाची दुकानं आणि गोदामं असल्यामुळे आग अधिकच पसरण्याची गंभीर भिती व्यक्त केली जात आहे. आग विझवण्यासाठी १६ अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या आगीमुळे आसपासच्या अनेक भागांमध्ये वीज गेल्याचीही माहिती मिळत आहे.
Maharashtra: Fire breaks out at Fashion Street market in Camp area of Pune. Fire tenders rushed to the spot. More details awaited. pic.twitter.com/EMepVu2TdE
— ANI (@ANI) March 26, 2021
पुण्यातल्या एमजी रोडवर असणाऱ्या फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये ही आग लागली आहे. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्यामुळे या भागामध्ये जाण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोठी कसरत करावी लागली. हे अडथळे पार करून काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आग कशी लागली? नेमकी किती वाजता लागली? किती मोठा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे? याविषयीचे सविस्तर तपशील वृत्त प्रकाशित करेपर्यंत प्राप्त झालेले नाहीत.
शुक्रवारी पहाटेच पुण्याच्या गंजपेठ भागामध्ये एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या भांडुप भागामध्ये ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेला काही तास उलटले असतानाच पुण्यात आगीची ही घटना घडली आहे. त्यामुळे वारंवार आगीच्या दुर्घटना का घडतायत? असा सवाल सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.