पुणे : डेअरीत आग लागून मालकाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर भागात घडली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली. रामदास साळुंके (वय ६५, रा. येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या डेअरी मालकाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात साळुंके यांची किसान डेअरी आहे. दररोज रात्री दूधाच्या गाड्या आल्यानंतर साळुंके डेअरीत झोपायचे. गुरुवारी रात्री ते डेअरीत झोपले होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास डेअरीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी पाहिले. रहिवाशांनी डेअरीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. डेअरीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता.
रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. कात्रज अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुनील नाईकनवरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. गंभीर होरपळलेल्या साळुंके यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.
हेही वाचा – पुण्यातील चार जागांवरून महाविकास आघाडीत तिढा
गुरुवारी पहाटे घोरपडे पेठेतील पंचहौद टाॅवरजवळ एका जुन्या वाड्याला आग लागण्याची घटना घडली होती. आगीत पाच खोल्या आणि दुकान जळाले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नव्हते.