पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीतील एका इमारतीत पहाटे आग लागली. इमारतीतील पहिल्या आणि मजल्यावर असलेल्या सदनिकांना आगीची झळ पोहोचली. रहिवासी बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर नताशा एनक्लेव्ह सोसायटी आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास सोसायटीच्या आवारात लावलेल्या एका दुचाकीने पेट घेतल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीतील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्याचे जवानांच्या लक्षात आले. गॅलरीतील साहित्य जळाल्याने धूर झाला होता. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखले सदनिकेत कोणी अडकले नाही, याची खात्री केली. त्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा – लष्करी अधिकारी असल्याच्या बतावणीने ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक
जवानांनी एका सदनिकेतून गॅस सिलिंडर बाहेर काढला. सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी गळती रोखली. जवानांच्या प्रसंगावधामुळे अनर्थ टळला. कोंंढवा अग्निशमन केंद्राचे अधिकारी कैलास शिंदे, दीपक कचरे, तांडेल नीलेश लोणकर, मोहन सणस, अनुराग पाटील, रामराज बागल यांनी आग आटोक्यात आणली.
नताशा एनक्लेव्ह सोसायटीत पाच मजली इमारती आहेत. जवानांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. इमारतीतील एका सदनिकेतून सिलिंडरमधील गळती होत होती. गळती रोखल्याने गंभीर दुर्घटना टळली. तळमजल्यावरील केशकर्तनालयाला आगीची झळा पाेहोचली नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. – कैलास शिंदे, प्रभारी अधिकारी, कोंढवा अग्निशमन केंद्र