Pune Breaking News Today: पुण्यातील मंगळवार पेठ येथील जुना बाजारातील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. जुन्या बाजारातील किमान ८ दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं दिसून येत आहे. अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं.
अग्निशामक विभागाचे अधिकारी पंकज जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे आग लागल्याची माहिती सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर घटनास्थळी काही मिनिटांत ८ गाड्या दाखल झाल्या आणि चारही बाजूने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तर या घटनेमध्ये ८ ते १० दुकानांतील माल जळून खाक झाला आहे. या दुकानांत इलेक्ट्रिक साहित्य आणि मोटारी होत्या. या घटनेमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.