पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग दुपारी दीडच्या सुमारास कोसळले असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेत रस्त्यावरील वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शाहीर अमर शेख चौकात अनेक मोठे होर्डिंग लावण्यात आले असून यातील एक मोठे लोखंडी होर्डिंग दुपारी कोसळले. दुपारी लोखंडी होर्डिंगचे कटिंग सुरु असताना ही घटना घडली. या होर्डिंगखाली एकूण ११ जण सापडले होते. यातील चौघांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेत काही रिक्षांचे नुकसान झाले आहे.

मृतांची नावे
भगवानराव धोत्रे (वय ४८)
भीमराव कासार (वय ७०)
शिवाजी देविदास परदेशी (वय ४०)

जावेद मिसबाऊद्दीन खान (वय ४९)

पाहा: या घटनेचा व्हिडिओ

गंभीर जखमी

उमेश धर्मराज मोरे (वय ३६)
किरण ठोसर (वय ४५)
यशवंत खोबरे (वय ४५)
महेश यशवंतराव विश्वेश्वर (वय ५०)
रुक्मिणी परदेशी (वय ५५)
देवांश परदेशी (वय ४०)
समृद्धी परदेशी (वय १८)

होर्डिंग कोसळल्यामुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक खोळंबली होती. चौकाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. कोसळलेले लोखंडी होर्डिंग हे रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने हे होर्डिंग काढण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले होते. होर्डिंग लावताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आक्षेप होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या पत्रांची दखलच घेतली नाही, असा आरोप महापालिका अधिकारी करत आहेत.