पुणे : उत्तरेतील धुक्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी पुणे विमानतळावरील विमानसेवेला फटका बसला. विमानतळावरून सकाळी होणारी पाच उड्डाणे आणि येणारी सात विमाने रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यातच विमान कंपन्यांकडून विमाने रद्द करण्याबाबत स्पष्ट सूचना न करण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये वाद होण्याचेही प्रसंग घडले.
देशात उत्तरेत धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रविवारपासून विमाने रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक विमानांना पाच ते सहा तासांहून अधिक विलंब होत आहे. उत्तरेतील धुक्याचा मोठा फटका विमानसेवेला बसत आहे. सोमवारी पुणे विमानतळावरील ११ उड्डाणे आणि इतर शहरांतून पुण्याला येणारी ९ विमाने रद्द करण्यात आली होती. पुणे विमानतळावर मंगळवारी पाच विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. याचवेळी इतर शहरांतून पुण्यात येणारी सात विमाने रद्द करण्यात आली. याबाबत विमान कंपन्यांनी प्रवाशांना सूचना केल्या नाहीत. त्यामुळे संतप्त प्रवाशांना चुकीच्या नियोजनाबद्दल विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींना धारेवर धरले.
हेही वाचा >>> पुणे: शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे मुख्य सूत्रधार- गुन्हे शाखेकडून मारणेचा शोध सुरू
अनेक विमानांना नेमका किती विलंब होईल, याबाबतही विमान कंपन्यांचे प्रतिनिधी काही सांगत नव्हते. अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती मांडली आहे. अनेक प्रवाशांना विमानतळावर पोहोचल्यानंतर विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली. कंपन्यांकडून वेळीच सूचना न मिळाल्याचा फटका त्यांना बसला. आधीच विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असताना उड्डाणांना होणाऱ्या विलंबामुळे गर्दीत आणखी भर पडत आहे. विमानतळावर प्रवाशांना बसायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रद्द झालेली उड्डाणे
– पुणे ते नवी दिल्ली, पुणे ते गुवाहाटी, पुणे ते चंडीगड, पुणे ते दिल्ली, पुणे ते दिल्ली या सकाळी १० वाजेपर्यंतच्या पाच विमानांचे मंगळवारी उड्डाण झाले नाही. याचवेळी दिल्ली ते पुणे, दिल्ली ते चंडीगड, दिल्ली ते पुणे, गुवाहाटी ते पुणे, दिल्ली ते पुणे, गोवा ते पुणे आणि दिल्ली ते पुणे ही सात विमाने रद्द करण्यात आली.
पुढील पाच दिवस धुक्याचे दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात थंडीची तीव्रता वाढणार असून, पुढील पाच दिवस धुके कायम राहणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तरेतील अनेक शहरांमध्ये विमानसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आधीच त्यांच्या विमानाचे ताजे वेळापत्रक तपासून प्रवासाला निघावे, अशी सूचना विमानतळ प्राधिकरणाने केली आहे.