पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १०० मिलिमीटर, तर घाटमाथ्यावर तब्बल ३०० मि.मी. पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा ३५ हजार क्युसेक एवढा करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पूरस्थिती कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धरणांमध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याचा विसर्ग कमी-जास्त केला जात आहे. मात्र, पुणे शहरातील नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठी नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्याची सूचना केली आहे. शहरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
हेही वाचा…पुणे : उजेड असेपर्यंत जास्तीजास्त पाणी सोडा, पालकमंत्री अजित पवार यांचे आदेश
गरवारे महाविद्यालय परिसरातील खिल्लारे वस्ती आणि महाविद्यालय परिसर, डेक्कन परिसरातील शितळा देवी मंदिर, संगम पूल आणि पुलासमोरील वस्ती, महापालिकेसमोरील जयंतराव टिळक पूल वाहतुकीसाठी बंद करावा, होळकर पूल आदी ठिकाणी महापालिकेने खबरदारी घेण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे.