पुणे : मुठा नदीपात्रात मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी मुरूम आणि मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. याचबरोबर नदीपात्रात मेट्रोच्या कामाचे साहित्य मोठ्या प्रमाणात पडून आहे. पावसाळ्याआधी नदीपात्र मोकळे न केल्यास गंभीर पूरस्थिती उद्भवण्याचा धोका आहे. पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील भराव व साहित्य हटवण्यासाठी दिलेली मुदतही महामेट्रोने पाळली नाही. यामुळे पाटबंधारे विभाग संभाव्य धोका टाळण्यासाठी नदीपात्राची पाहणी करून महामेट्रोला नोटीस बजावणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महामेट्रोने नदीपात्रातील साहित्य हटवावे, असे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी महामेट्रोला २९ मे रोजी पाठविले होते. पुणे मेट्रोच्या बांधकामासाठी नदीपात्रात डेक्कन, संगमपूल आणि बंडगार्डन येथे माती व मुरूमाचे भराव टाकण्यात आले आहेत. याचबरोबर बांधकामासाठीच्या वाहनांची ये-जा करण्यासाठी रॅम्प उभारण्यात आले आहेत. हे भराव आणि बांधकामाचे साहित्य यामुळे नदीच्या नैसर्गिक पूरवहन क्षेत्रात अडथळा निर्माण होऊन आगामी काळात पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी काळात यामुळे पूरपरिस्थिती उद्भवल्यास संपूर्ण जबाबदारी महामेट्रोची असेल, असे पत्रात म्हटले होते.

हेही वाचा – पुणे शहर राज्याच्या आणि देशाच्याही राजधानीच्या गेले पुढे, कोणत्या क्षेत्रात ? वाचा…

महामेट्रोला नदीपात्रातील साहित्य हटविण्यास १५ जूनची मुदत देण्यात आली होती. महामेट्रोने अद्याप नदीपात्रातील साहित्य हटविलेले नाही. पाऊस लांबल्याचे कारण यासाठी देण्यात येत आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस आणखी वाढल्यास खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. विसर्ग झाल्यास मेट्रोच्या नदीपात्रातील साहित्यामुळे पुण्यात पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली.

दिवसेंदिवस पात्र आणखी अरूंद

मुठा नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणामुळे पात्र अरूंद झाले आहे. त्यातच विविध विकासकामांमुळे नदीपात्राची वहनक्षमता कमी झाली आहे. मागील काही वर्षांतील पावसाळ्यातील उदाहरणे पाहिल्यास कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने पूरस्थिती उद्धवते. यातच आता मेट्रोसाठी नदीपात्रात मोठे खांब उभारण्यात आल्याने नदीपात्र आणखी अरुंद झाले आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आणखी वाढल्याचे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – सावधान! कृत्रिम स्वीटनरमुळे कर्करोगाचा धोका

नदीपात्रातील मेट्रोचे साहित्य व इतर राडारोडा १५ जूनपर्यंत हटविण्यास सांगितले होते. महामेट्रोने केवळ २० ते ३० टक्के नदीपात्र रिकामे केले आहे. इतर ठिकाणी साहित्य तसेच आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा नदीपात्राची पाहणी करून महामेट्रोला पत्र पाठविणार आहोत. – विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

नदीपात्रात मेट्रोच्या कामासाठी टाकलेला भराव आणि इतर साहित्य काढून घेण्यासाठी १५ जूनपर्यंत अवधी होता. सध्या सुरू असलेल्या कामाचे साहित्य आणि यंत्रे नदीपात्रात आहेत. लवकरात लवकर साहित्य आणि यंत्रे हटविण्यात येतील. – हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune flood risk due to metro inspection started by irrigation department pune print news stj 05 ssb
Show comments