पुणे : लक्ष्मी रस्त्यावर ‘पादचारी दिना’चा घाट घालण्यासाठी पुणे महापालिकेने ४७ लाख रुपये खर्चाची तरतूद केली खरे, पण याचे नेमके फलित काय, याबाबत अजूनही पुरेशी स्पष्टता आलेली नाही. लक्ष्मी रस्त्यावर या दिवशी वाहनमुक्ती असताना त्याला समांतर रस्ते कोंडीने ग्रासले आणि वाहनचालकच काय, पादचाऱ्यांनाही वाट काढणे मुश्किल झाले. अशा वेळी पादचाऱ्यांची सुरक्षितता, त्यांचा रस्त्यावर चालायचा हक्क याबाबत जनजागृती करण्याचा पालिकेचा उद्देश नक्की किती सफल झाला, याचे उत्तर नागरिक शोधत आहेत.
लक्ष्मी रस्ता बुधवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात वाहनांसाठी बंद ठेवून केवळ पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला होता. हा सुट्टीचा दिवस नसल्याने लक्ष्मी रस्ता परिसरातील शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन सकाळीच वाहनमुक्त योजनेत शिथिलता आणावी लागून काही चौकांतून वाहतूक सुरू करावी लागली. लक्ष्मी रस्त्यावर वाहने आणायची नसल्याने या रस्त्यावरील दुकानांत कामे करणाऱ्यांची वाहने लावण्याची पंचाईत झाली. त्यातील अनेकांनी शेजारच्या गल्लीबोळांत वाहने लावल्याने तेथून चालणेही मुश्किल झाले. त्यात वाहतूक कोंडीची भर पडली, ती वेगळीच. त्या दिवशी, सकाळी आणि दुपारी फार कमी पादचारी लक्ष्मी रस्त्यावर आले. त्यामुळे आजूबाजूच्या दुकानांना फायदा होण्याऐवजी उलाढाल मंदावल्याचा अनुभव आला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांनी केला कार्यकाळ पूर्ण
पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे म्हणणे आहे, की पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजनांसाठी ४७ लाख रुपयांच्या तरतुदीतून खर्च करण्यात आला. या निधीतून लक्ष्मी रस्त्यावर पदपथांची दुरुस्ती, पदपथांवरील रेलिंगला रंग देणे, रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे, मार्गिकांची आखणी करणे, दुभाजकांची दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे आदी कामे केली गेली. शहरातील प्रत्येक विभागाच्या अखत्यारितील सात चौकांत, अशी पाच विभागांत ३५ चौकांत महापालिकेने कामे केली. मात्र, यातून पादचाऱ्यांच्या हक्कांबाबत ठोस उपाययोजना काय झाली, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – पुणे : अभ्यासिकेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर महापालिकेने घेतला मोठा निर्णय !
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यासह शहरातील ३५ चौकांमध्ये पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कामे करण्यात आली. यासाठी ४७ लाख रुपयांची तरतूद होती. त्यातील नक्की किती निधी खर्च झाला आहे, याची माहिती पुढील आठवड्यात स्पष्ट होईल, असे महापालिकेचे पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.