पुणे : काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवड्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृहनेते,नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकावून २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खंडणी मागण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> पुणे : मिळकत कर सवलतीबाबत कार्यवाही पूर्ण; मंत्रिमंडळाकडून मान्यतेची प्रतीक्षा
याबाबत अविनाश रमेश बागवे (रा. पद्मजी पार्क, भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागवे यांच्या मोबाइलवर अज्ञाताने दूरध्वनी (व्हाॅटसॲप काॅल) केला. त्यांना धमकावून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास निवडणुकीला उभे राहू देणार नाही. गोळ्या घालून जीवे मारु तसेच राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी अज्ञाताने बागवे यांना दिली. बागवे यांनी पोलिसांकडून तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत आहेत.
हेही वाचा >>> राज्यातील शेतकरी ‘तंत्रस्नेही’ ; एका दिवसांत १.६१ लाख डिजिटल कागदपत्रे डाउनलोड
दरम्यान,श्री रामनवमीच्या शोभायात्रेत भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्या मोबाइलवर संपर्क साधून अज्ञाताने त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. बिडकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. राजकीय नेत्यांंना धमकावून खंडणी मागण्याच्या दोन घटना एकापाठोपाठ घडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बागवे आणि बिडकर यांना खंडणी मागणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. बागवे यांचा भवानी पेठेतील कासेवाडी परिसरातून निवडून आले होते. कासेवाडी भागात बागवे यांचे वर्चस्व आहे.