पुणे : मंदिरात गुलाल उधळल्यानंतर दिव्यावर पडून भडका उडल्याने चौदा वर्षांचा मुलगा होरपळल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावरील रामोशीवाडीत घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी नवनाथ जाधव (वय ५५), विजय शिंदे (वय ३८, रा. रामोशीवाडी, रत्ना हाॅस्पिटलमागे, सेनापती बापट रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुणाल विनोद कालेकर (वय ३९) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील रामोशीवाडीत वेताळबाबा मंदिर आहे. रविवारी रात्री मंदिरात भजनाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पवयीन मुलगा मंदिरात गेला होता. मंदिरात १५ ते २० जण उपस्थित होते आणि मंदिराबाहेरही भाविक थांबले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पालखी सोहळा सुरू झाला. तेव्हा जाधव याने शिंदे याच्या अंगावर गुलाल उधळला. त्याने रागाच्या भरात प्लास्टिक पिशवीतील गुलाल जाधव याच्या अंगावर टाकला. शिंदेने गुलाल उधळल्यांतर तो दिव्यावर पडला. गुलालात रासायनिक पदार्थ असल्याने भडका उडाला. दिव्याजवळ मुलगा थांबला होता. अचानक भडका उडाल्याने मुलाच्या शर्टाने पेट घेतला. त्यामध्ये तो जखमी झाला. प्रसंगावधान राखून मुलाला बाजूला ओढल्याने गंभीर दुर्घटना टळली. या घटनेत मुलगा १८ टक्के भाजला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी शिंदे, जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार तळपे तपास करत आहेत.