पुणे : लष्कर परिसरातील दोन महिलांनी सहा जणांना बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविल्यास नव्या इमारतीमध्ये व्यावसायिक गाळे किंवा निवासी गाळे देण्याचे आमिष दाखवून ६५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेहबूब अब्दुल गनी शेख (वय ६८, रा. लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फरहानाझ सादीक कुरेशी आणि हिना सादीक कुरेशी (दोघी रा. भिमपुरा, लष्कर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडला.

हेही वाचा – सायबर चोरट्यांकडून तीन कोटींहून अधिक रकमेचा गंडा, नऊ जणांची फसवणूक

हेही वाचा – लोणावळा : खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; २३ जण जखमी, द्रुतगती महामार्गावर दुर्घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचे पाच नातलग यांना दोघी आरोपींनी संगनमत करून बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून नव्या इमारतीतील व्यावसायिक गाळे किंवा निवासी गाळे कायमस्वरुपी खरेदीने देण्याचे ठरले होते. तक्रारदार आणि त्यांच्या पाच नातलगांनी एकूण ६५ लाख ५० हजार रुपये गुंतविले होते. नंतर त्यांना व्यवसायिक गाळे किंवा निवासी गाळे न देता, त्यांची फसवणूक केली. त्यांनी पैसे परत मागितल्यावर आरोपींनी वेगवेगळ्या बँकेचे धनादेश दिले. मात्र, खात्यात पैसे नसल्याने ते धनादेश परत आले. तक्रारदार हे पैसे मागण्यास गेले असता फरहानाझ कुरेशी या दुसरीकडे राहण्यास गेल्या असून त्यांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक गुजर पुढील तपास करीत आहेत.