पिंपरी : हाँगकाँगमधून फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्यासाठी काम करणाऱ्या पुण्यातील पाच जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली. नागरिकांची फसवणूक करून मिळवलेले चार कोटींहून अधिक रुपये कूटचलनाद्वारे (क्रिप्टोकरन्सी) हाँगकाँगमधील आरोपीला पाठविल्याचे तपासात समोर आले असून, शेकडो लोकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
जुनेद मुख्तार कुरेशी (वय २१, रा. टिंगरेनगर, पुणे), सलमान मन्सूर शेख (वय २२, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड, पुणे), अब्दुल अजीज अन्सारी (वय २३, रा. इंदिरा नगर, लोहगाव रोड, पुणे), आकिफ अन्वर आरिफ अन्वर खान (वय २९, रा. कोंढवा खुर्द, पुणे), तौफिक गफ्फार शेख (वय २२, रा. इंदिरा नगर, लोहगाव रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा…एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथील एका महिलेने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (एनसीसीआरपी) फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सायबर सेलकडून तपास सुरु होता. फिर्यादी महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केट क्लासेस आणि शेअर मार्केट गुंतवणुकीसंदर्भात एक जाहिरात दिसली. त्यांनी त्यावर ‘क्लिक’ केल्यावर त्यांना एका व्हॉट्सअप समूहाकत समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर गुंतवणुकीसाठी फिर्यादीकडून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यावर ३१ लाख ६० हजार रुपये घेतले.
काही दिवसानंतर गुंतवलेली रक्कम परत फिर्यादींनी मागितल्यावर असता ती रक्कम देण्यासाठी आरोपींनी चॅरिटी डोनेशन म्हणून आणखी चार लाख रुपये घेतले. फिर्यादीने पैसे पाठवलेल्या बँक खात्यांचे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार बँक खाते हाताळणारे आरोपी निष्पन्न करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल फोन, रोख रक्कम मोजण्याची मशीन, आठ डेबिट कार्ड, १२ चेकबुक, एक पासबुक आणि सात लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.
क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे हाँगकाँगला
आरोपींकडे १२० बँक खात्यांचे तपशील आढळून आले. त्या सर्व खात्यांवर आरोपींनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारणांमधील पैसे घेतले आहेत. बँक खात्यात पैसे आल्यानंतर आरोपी ते पैसे काढून घेत. त्यानंतर ते युएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमार्फत हाँगकाँग या देशात पाठवत होते. आरोपींनी आजवर चार कोटी रुपयांहून अधिक पैसे हाँगकाँग येथे पाठविले आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे ७५ पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत.
हेही वाचा…नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही : नीलम गोऱ्हे
हाँगकाँगमधून कारभार
या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्रेग हा हाँगकाँग येथे वास्तव्यास आहे. तेथून तो फसवणुकीचे नेटवर्क चालवतो. हाँगकाँगमधून सोशल मीडियासाठी जाहिराती आणि लिंक तयार केल्या जातात. त्या जाहिराती पाहून संपर्क साधणाऱ्यांना लगेच फोन येण्यास सुरुवात होते. शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सांगून गुंतवणुकीच्या बहाण्याने लाखो रुपये घेतले जातात. हे पैसे स्थानिक बँक खात्यांवर घेतले जातात. या रकमेचे कूटचलनात रूपांतर करून हाँगकाँगला पाठवले जाते. त्यासाठी स्थानिक पातळीवर काम करण्यांना काही रकिकम मिळते.