राज्याच्या बहुतांश भागाप्रमाणेच गेले आठ-दहा दिवस पुणे शहराच्या सर्व बाजूंना गारपीट व वादळी पाऊस झाला असला तरी पुणे शहरात मात्र नाममात्र पाऊस झाला आहे. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये सर्वच गारपिटीचा कहर सुरू असताना या काळात पुणे वेधशाळेत मात्र केवळ २ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या स्थितीद्वारे हवामानाच्या दृष्टीने पुणे शहर सुरक्षित असल्याचेच पाहायला मिळाले आहे.
गारपिटीने राज्याच्या बहुतांश भागांमध्ये धुमाकूळ घातला. राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात दररोज जोरदार गारपिटीमुळे शेतीचे आणि मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले. हीच स्थिती पुणे जिल्हय़ातही होती. पुण्याच्या चहूबाजूंनी गारपीट व वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्यात मुख्यत: बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड, नारायणगाव, आंबेगाव, मावळ तालुक्यांचा समावेश होता. सलगच्या गारपिटीमुळे पिकांची मोठी हानी झाली. एका एका वेळी अर्धा तास ते एक तास झालेल्या पावसाने भयंकर नुकसान घडवले. या पावसाची काही शे मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे. बारामती शहरात हे पाहायला मिळाले. रविवारी आणि सोमवारी बारामती शहर व आसपासच्या भागांत इतकी गारपीट झाली की रस्त्यांवर सुमारे अर्धा फूट ते फूटभर जाडीचा थर जमा झाला. त्यातून वाहने नेणेही कठीण झाले होते. हेच इतर भागांतही घडले.
आजूबाजूला हे घडत असताना पुणे शहरात केवळ २ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद रविवारच्या पावसाची आहे. याव्यतिरिक्त पुणे वेधशाळेत पावसाची किंवा गारपिटीची नोंद झालेली नाही. याशिवाय इतर वेळी शहराच्या काही भागांत काही सरी आल्या, पण त्या अतिशय स्थानिक पातळीवर असल्याने त्यांची नोंद झालेली नाही. पौड रस्त्यावर वनाज अशा एखाद्या ठिकाणी काही गारा पडल्या. पण त्या अपवादात्मक होत्या.
शहरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होते. पाऊस पडण्यासारखी स्थिती निर्माण होते. मात्र, किरकोळ सरी वगळता पाऊस काही पडत नाही. मंगळवारीसुद्धा पुण्यात हेच चित्र पाहायला मिळाले. ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहील. त्यानंतर मात्र, तापमानात वाढ व्हायला सुरुवात होईल, असा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ापासून पुणेकरांना उन्हाळय़ाचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिना सुरू झाला असला तरीही ढगाळ वातावरणामुळे तापमानात फारशी वाढ झालेली नाही. आता मात्र त्यात अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हा केवळ योगायोग!
‘‘गारपीट होणे ही अतिशय स्थानिक बाब असते. पुणे जिल्हय़ाच्या इतर भागात ती स्थिती निर्माण झाली म्हणून तिथे गारपीट व वादळी पाऊस झाला. तसे पुण्यात झाले नाही म्हणून गारपिटीपासून पुण्याची सुटका झाली. आसपासचा भाग व पुणे यात हवामानाच्या दृष्टीने विशेष फरक नाही. किंबहुना, पुणे उंचीवर असल्याने येथे गारपीट होण्यास जास्त अनुकूल स्थिती आहे. तरीही आपल्याकडे गारपीट झाली नाही, हा योगायोगाचा भाग आहे इतकेच म्हणावे लागेल.’’
– डॉ. सुनीता देवी, संचालक, पुणे वेधशाळा