पुणे – प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवात पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा (एफटीआयआय) झेंडा फडकला आहे. संस्थेतील दूरचित्रवाणी विभागाचा विद्यार्थी चिदानंद नाईक याच्या ‘सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो’ या लघुपटाची महोत्सवातील ‘ल सिनेफ’ या स्पर्धात्मक विभागात निवड झाली आहे.
यंदा ७७वे वर्ष असलेला कान चित्रपट महोत्सव १५ ते २४ मे या कालावधीत होणार आहे. जगभरातील चित्रपट प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सवात ‘ल सिनेफ’ हा अधिकृत स्पर्धात्मक विभाग आहे. यंदा या विभागात जगभरातील १८ लघुपटांची निवड करण्यात आली आहे. त्यातील चार अॅनिमेशनपट आणि १४ लाइव्ह अक्शन आहेत. पुण्यातील एफटीआयआयचा विद्यार्थी चिदानंद नाईक दिग्दर्शित सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो हा लघुपट या विभागातील एकमेव भारतीय लघुपट ठरला आहे. या लघुपटाचे छायांकन सूरज ठाकूर, संकलन मनोज व्ही, ध्वनिलेखन अभिषेक कदम यांनी केले आहे. महोत्सवातील विजेत्या लघुपटाला २३ मे रोजी पारितोषिक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती एफटीआयआयकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, यंदाच्याच महोत्सवातील चित्रपट विभागाच्या स्पर्धेत एफटीआयआयचीच माजी विद्यार्थिनी पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ हा चित्रपट निवडला गेला आहे.
हेही वाचा – पिंपरी : वाकडमध्ये नाकाबंदी दरम्यान २७ लाखांची रोकड जप्त
हेही वाचा – पुणेकरांचा हवाई प्रवास सुसाट! विमानतळावरून तब्बल ९५ लाख प्रवाशांचे ‘उड्डाण’
या पूर्वी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या लघुपटांची कान महोत्सवात निवड झाली आहे. मात्र दूरचित्रवाणी विभागाच्या विद्यार्थ्याचा लघुपट पहिल्यांदा निवडला गेल्याची माहिती एफटीआयआयच्या दूरचित्रवाणी विभागाचे प्रमुख प्रा. मिलिंद दामले यांनी दिली.