“गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक राहिले असून करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा उत्सव साजरा करताना काही नियम आणि अटी आखून दिल्या आहे. त्यानुसार गणेश मंडळांनी शासनाच्या आदेशानुसार ४ फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती बसवाव्यात,” असं आवाहन पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे हेदेखील उपस्थित होते. “आपल्या शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात दरवर्षी गणेश उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा करोनामुळे गणेशोत्सव शासनाच्या आदेशानुसार साजरा केला जाणार आहे. आपल्या शहरातील गणेश मंडळांनी आजपर्यंत प्रत्येकवेळी साथ आणि समाजाला संदेश देण्याचे काम केले आहे. आता गणेश उत्सवा मध्ये मंडळानी ४ फुटांपेक्षा कमी उंचीची मूर्ती बसवावी,” असं मोहोळ यावेळी म्हणाले.
तसेच मिरवणुका काढू नये, मंडळाच्या परिसरात मूर्तीचे, तर घरगुती गणपती घरीच विसर्जन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तर शहरातील मंडळांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल असं मोहोळ यांनी यावेळी सांगितलं.