पुणे : गणेशोत्सवासाठी मांडव टाकताना काही गणेश मंडळांकडून रस्त्यावर घेतले जात आहेत. त्याविषयी पालिकेकडे तक्रारी येत आहेत. खड्डे घेतल्यास ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित मंडळांचीच आहे. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
गणेश मंडळांनी मांडव उभारण्यासाठी खड्डे खोदले आहेत. याच्या काही तक्रारी देखील नागरिकांकडून पालिकेला मिळाल्या असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. खड्डे घेतल्यास ते बुजवून पुन्हा पूर्वीप्रमाणे करण्याची जबाबदारी संबंधित गणेश मंडळांचीच आहे. त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. गणेश मंडळांनी हे खड्डे न बुजविल्यास त्यांना पालिकेच्या माध्यमातून दिली जाणारी परवानगी देखील रद्द होऊ शकते, असे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा – आता ‘प्रकाशझोत’ कारवाईवर; दहीहंडी उत्सवानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त
खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम
शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी बुजविलेले अनेक खड्डे पुन्हा तयार झाले असून, अनेक भागात नवीन खड्डे तयार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम राबवा, अशा सूचना पालिका आयुक्त भोसले यांनी पथ विभागाला दिल्या आहेत.
शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पालिकेने यापूर्वी तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा तयार झाले आहेत. काही ठिकाणी पाणी साचून किंवा अन्य कारणांमुळे हे खड्डे तयार झाले आहेत. याची माहिती घेऊन पावसाने उघडीप देताच ते खड्डे बुजवावेत, अशाही सूचना दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा – कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
शहरातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. पावसाने थोडी उघडीप देताच गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम घेतली जाईल. अशीच मोहीम अनंत चतुदर्शीपूर्वी पाच दिवस राबवली जाईल. पावसाळ्यानंतर रस्ते पूर्णपणे दुरुस्त केले जातील. – डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका
© The Indian Express (P) Ltd