पुणे : वारजे भागात टोळक्याने वैमनस्यातून तरुणावर कोयते, कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. रहिवाशांवर कोयते उगारून टोळक्याने दहशत माजविली. याप्रकरणी सहा ते सातजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अक्षय राजेंद्र कांबळे (वय २८, रा. म्हाडा वसाहत, वारजे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. कांबळे याच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी भैय्या उर्फ लक्ष्मण शेडगे, आदित्य उर्फ बंटी मंडलिक, छोट्या मंडलिक यांच्यासह सहा ते सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जुबेर करीम शेख (वय २२, रा. म्हाडा वसाहत, वारजे) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – पुणे : टोमणे मारल्याने बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कांबळे, त्याचे मित्र जुबेर शेख, फारुख मणीयार हे शुक्रवारी (२० डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास म्हाडा वसाहतीतील इमारतीच्या परिसरात शेकोटी करुन थांबले होते. त्यावेळी आरोपी शेडगे, मंडलिक आणि साथीदार कोयते, कुऱ्हाडी घेऊन तेथे आले. टोळक्याने अक्षय याच्यावर कोयते आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. कोयते, कुऱ्हाडीचे वार अक्षयने हातावर झेलले. कोयत्याचा वार उजव्या हाताच्य मनगटावर बसला. त्याच्या उजव्या हाताचे मनगट आणि डाव्या हाताचा कोपरा तुटून वेगळा झाला. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला मदत करण्यासाठी म्हाडा वसाहतीतील रहिवाशी धावले. त्यानंतर आरोपींनी रहिवाशांवर कोयते, कुऱ्हाडी उगारुन दहशत माजविली. शिवीगाळ करुन आरोपी पसार झाले.
हेही वाचा – सराफी पेढीवर दरोडा टाकणारा चोरटा गजाआड
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सरदार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहेत.