पुणे : कोथरूड भागात संगणक अभियंत्याला बेदम मारहाण प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंड गजानन उर्फ गजा मारणे हा सोमवारी सायंकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर सोमवारी मारणे हा आईसोबत पोलीस ठाण्यात हजर झाला.

संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना कोथरूड भागात शिवजयंतीच्या दिवशी मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केली. या प्रकरणी गजा मारणे, रूपेश मारणेसह सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

या प्रकरणी मारणेचा भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईची चाहूल लागताच गजा मारणे, रूपेश मारणे, बाब्या पवार हे पसार झाले. कोथरूड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून दोघांचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांनी मारणेच्या वास्तव्याच्या ठिकाणी छापे टाकले. मुळशी तालुक्यात शोध घेण्यात आला. जवळपास ७४ ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

‘बस झाला चोर-पोलिसांचा खेळ’

गजा मारणेचा शाेध सुरू होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘बस झाला चोर-पोलिसांचा खेळ, त्याला हजर होण्यास सांगा,’ असा इशारा दिला. त्यानंतर मारणे सोमवारी सायंकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी मारणेचा साथीदार रुपेश मारणे, बाब्या पवार हे पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

नेमके काय घडले ?

शिवजयंतीच्या दिवशी गजा मारणे आणि साथीदार कोथरूडमधील एका मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्याचा गाड्यांचा ताफा भेलकेनगर चौकात आला. त्या वेळी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक निघाली होती. दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी झालेल्या वादातून मारणे टाेळीतील गुंडांनी जोग यांना बेदम मारहाण केली. मारणेच्या ताफ्यातील वाहनांची माहिती घेण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. मारणेच्या ताफ्यातील दुचाकी आणि मोटारी जप्त करण्यात येणार आहेत, तसेच मारणेच्या मालमत्तेची माहिती घेण्यात येत आहे.

Story img Loader