लोणावळा : कामशेत भागात पोलिसांनी ५७ लाख रुपयांचा ९८ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक केली.
अभिषेक अनिल नागवडे (वय २४), प्रदीप नारायण नामदास (वय २५), योगेश रमेश लगड (वय ३२) वैभव संजीवन चेडे (वय २३, चौघे रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कामशेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मळवली ते लोणावळा दरम्यान मोटारीतून गांजा विक्रीस आणण्यात येणार असल्याची माहिती कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोटार थांबविली. मोटारीची तपासणी करण्यात आली. तेव्हा मोटारीमध्ये पोत्यात गांजा सापडला. पोलिसांनी नागवडे, नामदास, लगड, चेडे यांना ताब्यात घेतले. आरोपी गांजाची विक्री कोणाला करणार होते, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा – पुणे : जोगवा मागणाऱ्या एकाकडे हप्त्याची मागणी, हडपसर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नितेश कदम, रवींद्र रावळ, जितेंद्र दीक्षित, समीर करे, रवींद्र राय, गणेश तावरे यांनी ही कारवाई केली.
लोणावळा परिसरात एक कोटी ९२ लाखांचे अमली पदार्थ जप्त
लोणावळा परिसरात पोलिसांनी गेल्या वर्षभरात संकल्प नशा मुक्ती मोहिमेअंतर्गत कारवाई करून एक कोटी ९६ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी ७१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १०२ जणांना अटक करण्यात आली. लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.