पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकींना सुरूवात झाली असून त्या निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी पुणे पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी ८ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. याशिवाय मागील वर्षीपेक्षा यंदा लवकर मिरवणूक मार्गी लावण्यावर पोलिसांचा विशेष भर असणार आहे.

याबाबत पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी यापूर्वीच पत्रकार परिषदेत माहिती दिली. विविध संघटनेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी वाहतूक नियमनाचे काम पाहणार आहेत. तर यंदा मानाच्या गणपतींमध्ये ३ ढोल ताशा पथक आणि इतर मंडळाकरीता २ पथकांचीच परवानगी देण्यात आली आहे. या मिरवणुकीत सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष असणार आहेच. पण पोलिसांकडे असणार्‍या ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र, चित्रीकरणासाठी खासगी ड्रोनला परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग व परिसरातील १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Story img Loader