राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर, पुण्यातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठीचा आराखडा पालिका प्रशासनाने सोमवारी सादर केला. या आराखड्यामध्ये काही त्रूटी असल्याचे मत शिवसेना नेते आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. ते यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. उरुळी आणि फुरसुंगी डेपोमध्ये कचरा टाकण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर पुण्यातील कचरा कुठे टाकायचा प्रश्न निर्माण झाला होता.  मात्र, आता पिंपरी-चिंचवड येथील सांडस येथे कचरा डेपोचे नियोजन सुरु आहे. यावर अजून किती दिवस दुसऱ्याच्या जागेत कचरा टाकावा लागणार? असा प्रश्न शिवतारे यांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवतारे म्हणाले की, उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे मागील २० वर्षांहून अधिक कालावधीपासून कचरा टाकला जातो. मात्र, तिथे आतापर्यंत चांगला प्रकल्प राबविण्यात आलेला नाही. येत्या काळात शहरात कचरा प्रकल्प राबविण्याची गरज आहे. कचरा प्रश्न सोडवायचा असेल तर प्रामुख्याने सोसायटयांमध्ये कचरा प्रकल्प  राबवण्याची गरज आहे. तसेच वेळप्रसंगी कायद्याचा बडगा देखील उगारला गेला पाहिजे.

मागील महिन्यात उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुणे शहरातील कचरा तेथील डेपोमध्ये टाकण्यास विरोध दर्शवला होता. पालिका प्रशासन आणि महापौर यांच्या ग्रामस्थांसोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला एक महिन्याच्या आत राज्य सरकारला कचरा प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी आराखडा सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार, प्रशासनाने मागील आठवड्यात महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे आराखडा सादर केला. त्यानंतर आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, पालिकेचा आराखडा मुख्यमंत्र्यासमोर सादर करुन यावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी खासदार अनिल शिरोळे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,आमदार मेधा कुलकर्णी आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune garbage issue vijay shivtare make emotional appeal