पुणे शहरातील कचरा कोणतीही प्रक्रिया न करता फुरसुंगीमध्ये टाकण्याविरोधात तेथील ग्रामस्थ नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आंदोलन करणार असून, फुरसुंगीमध्ये कचऱय़ाच्या गाड्या येऊ न देण्याचा निर्धार तेथील ग्रामस्थांनी बुधवारी व्यक्त केला. प्रक्रिया न करता शहरातील कचरा या गावामध्ये टाकण्याच्या विरोधात याआधीही ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिकेला आणि राज्य सरकारला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण या मुदतीत कोणताच निर्णय न घेतल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी कचरा टाकण्याला गुरूवारपासून विरोध करण्याचे ठरविले आहे. पुण्याचे नवे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ग्रामस्थ, महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱयांची बैठक झाली.
शहरात सध्या रोज सरासरी दीड हजार टन कचरा गोळा होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रतिदिन पाच टन क्षमतेचे बावीस प्रकल्प शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमध्ये रोज शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. तसेच उरुळी येथे हंजर, रोकेम यासह आणखी दोन कंपन्यांना कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम देण्यात आले आहे. या कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये रोज सुमारे चौदाशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित असले, तरी प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पांमध्ये जेमतेम शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळेच उरुळी व फुरसुंगी येथील कचऱ्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. प्रक्रिया होत नसल्यामुळे डेपोमध्ये फक्त कचरा साठवून ठेवला जात आहे आणि त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे.

Story img Loader