पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या १९२ वर पोहोचली आहे.

कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय पुरुषाचा जीबीएसने रविवारी (ता.९) रात्री मृत्यू झाला. तो बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमधील रहिवासी होता आणि वाहनचालक म्हणून काम करीत होता. या रुग्णाला ३१ जानेवारीपासून अशक्तपणा जाणवत होता. त्याला पुण्यातील भारती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, नातेवाईकांनी १ फेब्रुवारीला त्याला तेथून हलवून निपाणीमध्ये नेऊन उपचार सुरू केले. तेथील उपचारांमुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याला सांगलीतील भारती रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात ५ फेब्रुवारीला दाखल करण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात जीबीएसचे आतापर्यंत १९२ रुग्ण आढळून आले असून, त्यातील १६७ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. पुण्यातील जीबीएस रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, पुणे महापालिका ३९, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९१, पिंपरी-चिंचवड महापालिका २९, पुणे ग्रामीण २५ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ४८ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात ९१ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

वयोगटनिहाय जीबीएस रुग्णसंख्या

वयोगट – रुग्ण

० ते ९ – २३

१० ते १९ – २२

२० ते २९ – ४२

३० ते ३९ – २३

४० ते ४९ – २६

५० ते ५९ – २८

६० ते ६९ – २०

७० ते ७९ – ४

८० ते ८९ – ४

एकूण – १९२

Story img Loader