पुणे : भारतीय लष्कराच्या स्थापना दिवसानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्य२ ‘आर्मी डे परेड’चा मान पुण्याला मिळाला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे येत्या १५ जानेवारीला पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली होती. या दिवशी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून १५ जानेवारीला आर्मी डे साजरा करण्यात येतो.
हेही वाचा >>> Nana Patekar : नाना पाटेकर म्हणाले, “देवेंद्र तुम्ही खरंच खूप बारीक झालात..”; फडणवीस दिलखुलास हसले!
दोन वर्षांपूर्वीपर्यंत हा कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात येत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम दिल्लीबाहेर आयोजित करण्यात येत आहे. २०२३मध्ये आर्मी डे परेड पहिल्यांदाच दिल्लीबाहेर बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होता. त्यानंतर २०२४ मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आर्मी डे परेड आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता २०२५ची आर्मी डे परेड पुण्यात आयोजित केली जाणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यात होऊ घातलेल्या आर्मी डे परेडची तयारी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सुरू करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठीचे स्थळ लवकरच निश्चित केले जाणार आहे. बेंगळुरूमधील कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मुख्यालयानेच केले होते. आता पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमामुळे मुख्यालयाला दुसऱ्यांदा आयोजनाची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लष्कराचा गौरवशाली इतिहासासह पुण्याचे उलगडण्यात येणार आहे. तसेच देशाच्या संरक्षण क्षेत्रातील क्षमता, आत्मनिर्भर होण्याचा प्रवास याचाही वेध घेतला जाणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.