पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे या विद्यार्थिनीने मुलींमध्ये पहिला, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

संरक्षण दलाच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही शाखांचे प्रशिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये दिले जाते. संरक्षण दलात मुलींनाही समान संधी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०२१मध्ये पहिल्यांदा मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारे खुली करण्यात आली. त्यानुसार २०२१मध्ये प्रवेशित मुलींची पहिली तुकडी मे महिन्यात बाहेर पडणार आहे.

युपीएससीतर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया राबवण्यात येते. यंदाही सुमारे दीड लाख मुलींनी अर्ज केला होता. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात पहिले, तर सर्वसाधारण यादीत तिसरे स्थान प्राप्त केले. ऋतुजाचे आई-वडील शिक्षक आहेत.

एनडीए प्रवेश परीक्षेतील यशाबाबत ऋतुजा म्हणाली, मुलींमध्ये देशात पहिले आणि सर्वसाधारण यादीत तिसरे स्थान मिळवणे ही अभिमानास्पद कामगिरी आहे. या यशामुळे खूप आनंद झाला आहे. माझे कुटुंबीय, मार्गदर्शकांचाही या यशात मोठा वाटा आहे. एनडीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून लष्करासाठी पायलट होण्याचा मानस आहे. त्यासाठीची सीपीएसएस ही परीक्षाही दिली होती. नववीत असतानाच सैन्यात जायचे ठरवले होते. त्यामुळे एनडीएच्या प्रवेश परीक्षेसाठी अकरावीपासून कसून मेहनत करायला सुरुवात केली होती.