पुण्यातील वानवडी परिसरात २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमागे महाआघाडी सरकारमधील एक मंत्री असल्याची चर्चा सुरू असताना आता त्या तरुणीच्या जवळील एका व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये ती व्यक्ती साहेब ती आत्महत्या करणार आहे. तिला समजून सांगा असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोणासोबत बोलत आहे हे उघड झालेलं नाही. पण या संपूर्ण घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

त्या तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी करु नये : देवेंद्र फडणवीस

मुळची परळीच्या असणाऱ्या तरुणीने पुण्यात रविवारी मध्यरात्री आत्महत्या केली. ही तरुणी शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आसपास तिनं महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच या तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं. पण या तरुणीच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मजकूर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारं निवेदनही भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना दिलं आहे.

त्यातच आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. वानवडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक लगड यांना विचारण्यात आलं असता प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

फडणवीसांची मागणी
“मी सुद्धा या प्रकरणाची बातमी वाचली. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. समाज माध्यमांमध्ये काही क्लिप फिरत आहेत असंही मला सांगण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. यामधील सत्य काय आहे हे जनतेसमोर आणलं पाहिजे. एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याच्या भोवती तयार झालेलं संक्षयाचं वर्तुळ आहे ते दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी करु नये. त्यासंदर्भात सत्य पोलिसांनी बाहेर आणावं,” असं मत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.