पुणे : पहिल्या राज्यस्तरीय ‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन’ २० ते २२ डिसेंबर या काळात पुण्यात होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विविध परिसंवाद, चर्चासत्रे, कविसंमेलनातून सरकारी अधिकारी व्यक्त होणार आहेत. या संमेलनात आजी-माजी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, चित्र-छायाचित्रांचे प्रदर्शन, नव्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष आहेत.

हेही वाचा : पालकांनो सावधान…मुलांच्या हातात गाडी देताय ?

मराठी भाषेला नुकताच केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच राज्य शासनाने मराठी भाषा धोरण देखील नुकतेच जाहीर केले आहे. प्रशासनात व लोकव्यवहारात मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन व संवर्धन होण्यासाठी सर्वच स्तरावर व्यापक व विस्तृत प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लेखन साहित्य समाजापुढे यावे, त्यांना लेखनासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे साहित्य संमेलन महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे.

हे संमेलन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने वरिष्ठ व सनदी अधिकारी यांना ऐकण्याची व भेटण्याची नामी संधी अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यानिमित्त मिळणार आहे.

हेही वाचा : पिंपरी : महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी, शहराच्या ४० वर्षांच्या इतिहासात एकदाही मंत्रिपद नाही

महाराष्ट्र राज्याला साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. गेल्या शतकामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मराठी साहित्यात अतिशय मोलाची भर टाकली आहे. सध्या राज्याच्या प्रशासनात जवळपास १८ लाख अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी काही अधिकारी-कर्मचारी हे त्यांचे शासकीय कामकाज सांभाळून साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहेत. तसेच अनेक शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मानाचे पुरस्कार सुध्दा मिळालेले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune government officer marathi sahitya sammelan to be held on 20th to 22nd december pune print news ccm 82 css