पुणे : मोटारसायकल विकल्यानंतर त्याचे राहिलेले सहा हजार रुपये, तसेच किराणा मालाच्या उधारीचे पैसे देत नसल्याने किराणा दुकानदाराने एक युक्ती केली. गाडी विक्रीच्या वेळी दिलेल्या धनादेशाचा वापर करून ११ हजार रुपये बँकेतून काढून घेतले. या प्रकाराने दुकानाशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने किराणा दुकानदाराला बेदम मारहाण करून दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त करून टाकल्याचा प्रकार घडला.

याबाबत वैभव ज्ञानदेव चव्हाण (वय २९, रा. गुरुदत्त पार्क, मोरे वस्ती रोड, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विठ्ठल बाळू कुचेकर, अशोक विठ्ठल कुचेकर, प्रणव रावळ (सर्व रा. मोरे वस्ती, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथील ओम बालाजी ट्रेडर्स या दुकानात १५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव चव्हाण यांच्या घराजवळ ओम बालाजी ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाशेजारी विठ्ठल बाळू कुचेकर राहतात. वैभव चव्हाण यांनी विठ्ठल कुचेकर यांना ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची मोटारसायकल ६० हजार रुपयांना विकली होती. त्याचे ५४ हजार रुपये त्यांनी दिले होते. उर्वरित सहा हजार रुपये ते देत नव्हते. तसेच विठ्ठल हा वैभव यांच्या दुकानातून किराणा सामान नेहमी उधारीवर नेत होता. उधारीचे पाच हजार रुपये झाले होते. त्यांनी पैसे मागितल्यावर विठ्ठल वारंवार ‘आज देतो, उद्या देतो,’ असे सांगत होता. गाडीचा व्यवहार झाला तेव्हा विठ्ठल याने त्याच्या बँकेचा धनादेश दिला होता. तो पैसे देत नसल्याने वैभव यांनी दिलेला धनादेश बँकेत जमा करून ११ हजार रुपये काढून घेतले.

वैभव व त्यांचे वडील नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकानात असताना विठ्ठल आणि त्यांची पत्नी अंजली कुचेकर हे दोघे तेथे आले. त्यांनी वैभव यांच्याशी हुज्जत घातली. ‘तुम्ही धनादेश का वटवला,’ अशी विचारणा करून, धमकी देऊन दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या. काही वेळाने त्यांचा मुलगा अशोक कुचेकर आणि त्याचे मित्र प्रणव रावळ व इतर तेथे आले. त्यांनी वैभव चव्हाण यांना पट्ट्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या वडिलांना काठी आणि दगडाने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. हवालदार बनसुडे पुढील तपास करीत आहेत.