महाराष्ट्राच्या विधासभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उमेदवारांची नावे अद्याप जाहीर व्हायची आहेत. गेल्या काही काळात घरोघर डबेडुबे पोहोचवणारे, वृद्धांना धार्मिक स्थळांचे पर्यटन घडवून आणणारे, चौकाचौकात, खांबाखांबावर आपली भव्य छायाचित्रे लावणारे, आपल्या साऱ्यांचे भविष्यदाते, तारणहार यांची लगबग आपण अनुभवतोच आहोत. गणेशोत्सव असो की नवरात्र की कोजागिरी पौर्णिमा, या सगळ्या इच्छुकांनी आजपर्यंत जमवलेली सारी माया मायबाप मतदारांवर अक्षरश: उधळून टाकली आहे. आपण सारे त्याचे लाभार्थी आहोत! कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाचे तिकिट कापणार, कोण कुठल्या पक्षात जाणार, कोणाला कोणता पक्ष पळवणार, याबद्दलच्या बातम्या आता रोज आपल्या कानावर आदळणार. येत्या दिवाळीत आपल्यावर फराळ आणि भेटवस्तूंचा वर्षाव होणार. त्यामुळे आपण डोळे झाकून मतदान करणार काय?

पानशेतच्या पुरानंतर पुणे शहर सर्वार्थाने बदलत गेले. पेठांचे पुणे राहिले नाही. ते चहूबाजूला वाढत गेले. त्यामुळे टिळक रस्ता हा त्याकाळचा पुण्याचा केंद्रबिंदू सरकत सरकत पार शेतकी महाविद्यालयापर्यंत गेला. सहकारनगर, वानवडी, खडकवासला, विमाननगर, खराडी, कल्याणीनगर, हडपसर अशा चहूबाजूंनी पुणे शहर वाढत गेले. एवढे होऊनही राजकीय पक्षांची शहर विस्ताराची हौस काही भागली नाही. त्यांनी हद्दीलगतची तीन डझन गावे समाविष्ट करून टाकली. आता या अगडबंब शहराचे प्रश्न अधिक तीव्र होऊन आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. रस्ते, पाणी, मैलापाणी, सांडपाणी हे तर मूलभूत प्रश्न. ते सोडवण्याचा कोणताही दूरदृष्टीचा विचार विधानसभेतील पुण्याच्या प्रतिनिधींनी केला नाही. राज्य सरकारकडून या शहराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळवण्यातही हे आमदार फार अग्रेसर राहिले नाहीत. त्यामुळे आग लागल्यावर विहिर खणायला लागली. आणि वाहतुकीचा प्रश्न वाढत गेल्यानंतर मेट्रो प्रकल्प हाती घेतला गेला. पण त्याच्या बरोबरीने पीएमपीएल सक्षम करण्याबाबत आपण कच खाल्ली. परिणामी मेट्रो आली, तरी तेथपर्यंत जाण्यासाठी स्वतःचे वाहन वापरण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. बरे ही वाहने लावण्याची सुविधाही होत नसल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होऊन बसला.

हेही वाचा – पुणे : वाघोलीतील कंपनीच्या गोदामातून २४४ लॅपटॉप चोरणारे गजाआड, २४४ लॅपटाॅप, दोन टेम्पो जप्त

आत्ताच संपूर्ण पुणे शहराला पुरेसे पाणी मिळत नाही. येत्या काही दशकांत या शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येला पाणीपुरवठा कसा करणार? याबद्दल कुणाच्याही डोक्यात काहीही विचार नाही. नवे धरण बांधता येणार नाही, त्यामुळे आहे, तेवढ्याच पाणीसाठ्यात यापुढील काळात गुजराण करावी लागेल, तर पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचवता येईल, याचे भानच नसलेले लोकप्रतिनिधी असू नयेत, याची काळजी आपणच घेतली पाहिजे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या बाबतीत पुणे पालिकेच्या ढिसाळपणामुळे देश पातळीवरील स्वच्छ भारत अभियानात पुण्याचा क्रमांक पहिल्या पाचांमध्ये लागू शकत नाही. या अशा ढिसाळ कारभारावर अंकुश ठेवू शकेल, असे आमदार निवडण्याचे काम कठीण आहे खरे, पण….

हेही वाचा – बनावट कागदपत्रांद्वारे ५६१ कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी- जीएसटी पुणे कार्यालयाकडून हैद्राबादमधील एकास अटक

मतदानाबाबत अतिशय अनुत्साही असल्याचा जो आरोप पुणेकरांवर होत आहे, तो दूर करणे आपल्या हाती आहे. नुसते मतदानाला जाऊनही चालणार नाही. अतिशय विचारपूर्वक, आपल्या शहराच्या भविष्याचा पूर्ण विचार करून, हे भविष्य समजून घेणाऱ्या आणि आपल्या प्रश्नांबद्दल सहानुभूती बाळगून ते सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या उमेदवाराला मत दिले नाही, तर पुढील अनेक वर्षे आपले जगणे कमालीचे दु:खद असणार आहे, याची जाणीव ठेवायला हवी. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सहलीला कुठे जायचे, याचे मनसुबे करणे सोडून आपल्याच भविष्याची काळजी करायला आपण शिकले पाहिजे.

mukundsangoram@gmail.com