पुणे : रंगावलीच्या मनमोहक पायघड्या, बँड पथकातील वादकांचे सुमधूर वादन, विविध तालाचा आविष्कार घडविणारे ढोल-ताशा पथकातील कलाकारांचे वादन, ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करत वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक जल्लोषात सुरुवात झाली. मिरवणुकीत सहभाग घेत दुचाकीवरून एका चौकातून दुसऱ्या चौकाकडे जाणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दरवर्षी महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ठीक दहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपुष्टात आल्याने दुसऱ्या वर्षी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टिळक आणि कसबा गणपतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, अभय छाजेड यांच्यासह राजकीय पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. माजी खासदार गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांचे नसण्याची सर्वांनी आठवण काढली. नगारावादनाच्या गाड्यामागे प्रभात बँडपथक, कामायनी प्रशाला आणि बँक ऑफ इंडियाचे पथक कसबा गणपतीच्या मिरवणुकीत होते. गणपती मार्गस्थ झाल्यावर ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग आणि केसरीवाडा ही मानाची मंडळे बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ झाली.

हेही वाचा : विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते बंद; पालकमंत्र्यांनी केला मेट्रोने प्रवास

सकाळपासून असलेले ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता ध्यानात घेऊन पुणेकरांनी रस्त्यावर येण्यापेक्षा घरात थेट प्रक्षेपण पाहणे पसंत केले. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू असताना तुलनेत गर्दी कमी असल्याचे जाणवले. जे गणेशभक्त रस्त्यावर होते त्यांना ढोल-ताशा पथकातील कार्यकर्त्यांनी दोर लावून केलेल्या ढकलढकलीला सामोरे जावे लागले. विसर्जन मिरवणूक जणू या पथकांच्या ताब्यात गेली आहे, असेच चित्र लक्ष्मी रस्त्यावरील उपस्थित नागरिकांना आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune guardian minister chandrakant patil travel on two wheeler from one chowk to other during ganesh visarjan pune print news vvk 10 css