पुणे : नांदेड गाव परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या भागातील ६२ रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यात २६ रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण शून्य आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत पाण्यात क्लोरिनचे योग्य प्रमाण राहील, याची खबरदारी घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.
पुणे विभागात जीबीएसचे १६३ रुग्ण आहेत. त्यांपैकी नांदेडगावच्या ५ किलोमीटर परिसरात ७७ रुग्ण आहेत. उर्वरित रुग्ण पुण्याच्या इतर भागांतील आहेत. त्यामुळे नांदेडगाव परिसरात या आजाराचा उद्रेक दिसून येत आहे. आरोग्य विभागाने नांदेडगाव परिसरातील ६२ रुग्णांच्या घरी भेट देऊन पाण्याच्या स्रोताची माहिती घेतली. त्यात पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण आणि त्यात पुरेशा प्रमाणात क्लोरिन आढळून आले. मात्र, २६ रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण शून्य आढळून आले. यामुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला पाण्यात क्लोरिनची मात्रा वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जलद प्रतिसाद पथकाचे अध्यक्ष व आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
राज्य सरकारने पुणे विभागासाठी जल प्रतिसाद पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या बैठकीत पुण्यातील रुग्णस्थितीचा आढावा घेण्यात आला. जैववैद्यकीय तपासणीसाठी पाण्याचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) न पाठवता राज्य किंवा जिल्हा प्रयोगशाळेत पाठवावेत, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. याचबरोबर आयव्हीआयजी इंजेक्शनच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला. विक्रेत्यांनी या इंजेक्शनची जादा दराने विक्री करू नये, यासाठी तपासणी करण्याची सूचना करण्यात आली.
रुग्णसंख्या १६६ वर
राज्यात जीबीएसची रुग्णसंख्या मंगळवारी १६६ वर पोहोचली. त्यात पुणे महापालिका ३३, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील ८६, पिंपरी-चिंचवड महापालिका १९, पुणे ग्रामीण २० आणि इतर जिल्ह्यांतील ८ रुग्ण आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे राज्यभरात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे ५२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.
जीबीएस रुग्णसंख्या
एकूण रुग्ण – १६६
रुग्णालयात दाखल – १०९
अतिदक्षता विभागात दाखल – ६१
व्हेंटिलेटरवरील रुग्ण – २१
बरे झालेले रुग्ण – ५२
एकूण मृत्यू – ५
जीबीएस आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांची मानसिक स्थिती ठीक राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. या रुग्णांचे टेलिमानस सेवेद्वारे वरिष्ठ मनोविकृती तज्ज्ञांद्वारे समुपदेशन केले जाईल.
डॉ. राधाकिशन पवार, अध्यक्ष, जलद प्रतिसाद पथक
पाण्यासह अन्नाच्या नमुन्यांची तपासणी
जीबीएसचा उद्रेक झालेल्या भागातील पाणी आणि अन्नाच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. नांदेडगाव परिसरातील हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणि पोल्ट्रीमधील चिकनचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर काही सोसायट्यांमध्ये विविध ठिकाणचे पाणी वापरले जाते. या सोसायट्यांच्या टाकीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देशही जलद प्रतिसाद पथकाने दिले आहेत.